म्हणे, नॉट इन माय नेम...

By Admin | Published: July 1, 2017 06:18 PM2017-07-01T18:18:54+5:302017-07-01T18:50:45+5:30

जेननेक्स्टसाठी अनुभवाचं ‘भरत’वाक्य!

I said, not in my name ... | म्हणे, नॉट इन माय नेम...

म्हणे, नॉट इन माय नेम...

googlenewsNext

लोकमत एक्सक्लुझिव्ह
- भरत दाभोळकर

गुरू या संकल्पनेवर विश्वास नसलेला एक यशस्वी अ‍ॅड गुरू, लेखक, नट, डान्सर, बॉक्सर आणि खूप काही असणारा हरफनमौला भरत दाभोळकर उघडतोय त्याच्या अनुभवाची आणि वेगळ्या दृष्टीची पोतडी.नियमितपणे खास लोकमतसाठी.


जेननेक्स्टसाठी अनुभवाचं ‘भरत’वाक्य!


लोकांना ठेचून मारण्याच्या गोरक्षकांच्या वेडपट आणि अपरिपक्व कृतीच्या मी पुरता विरोधात आहे. अर्थात मी आणखीही बऱ्याच गोष्टींच्या पक्का विरोधात आहे. हे नमूद करण्याची वेळ आली, ती नॉट इन माय नेम या सध्या व्हायरल झालेल्या हॅशटॅगमुळं! काहींच्या मते "समाज आणि धर्माच्या नावे जी काही हिंसा होत आहे, त्याचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन आहे. नॉट इन माय नेमचे फलक हातात घेऊन लोक आमचा या हत्यांशी काही संबंध नसून, आम्ही याचा निषेध करतो असं सांगत आहेत"". नॉट इन माय नेम’ नावाने सुरु असलेलं हे आंदोलन मुस्लिमांवर होणारे हल्ले आणि हत्या यांचा विरोध करण्यासाठी असून गोरक्षक तसंच हिंदू धर्माच्या स्वयंघोषित रक्षणकर्त्यांकडून होणा-या हत्यांच्या विरोधात हा आवाज उठवला जात आहे, म्हणे !अमेरिकेनं व्हिएतनामवर युद्ध लादलं तेव्हा लाखोंच्या संख्येने अमेरिकेतील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. ""तुम्ही जे युद्ध करत आहात त्याला आमचं नाव देऊ नका (नॉट इन माय नेम), त्याला आमचं अजिबात समर्थन नाही"", असं अमेरिकेतील नागरिकांनी स्पष्ट केलं होतं. भारतात सध्या सुरु असलेलं हे आंदोलन अशाच स्वरुपाचं आह की वेगळं काही, हा प्रश्न मला छळतो आहे.

म्हणूनच मग मनात आलं, की मी नेमका कशाकशाच्या विरोधात आहे ?...
लोकांना ठेचून मारण्याच्या गोरक्षकांच्या वेडपट आणि अपरिपक्व कृतीच्या मी पुरता विरोधात आहे...
लष्कराच्या जवानांवर दगड फेकणाऱ्या काश्मिरींच्या मी विरोधात आहे...
वातानुकुलित सुरक्षित दालनात बसून लष्कराचे नीतीधैर्य खच्ची करणारी हकनाक टीका करणाऱ्या नेत्यांच्या मी पुरता विरोधात आहे...
शिक्षा झालेल्या अतिरेक्यांच्या समर्थनार्थ सरसावणाऱ्यांच्याही मी पुरता विरोधात आहे...
गोरक्षकांच्या जमावानं बीफच्या मुद्यावरून कोणाला ठेचून मारण्याला माझा विरोध आहे, हे मी नॉट इन माय नेमच्या निमित्तानं सोशल मीडियावरून स्पष्ट केल्यानंतर एकानं मला खडा सवाल विचारला...ईश्वराविषयी निंदाजनक वाटणारी भाषा लिखाणात वापरल्याच्या ग्रहातून केरळात के. टी. जोसेफ यांचा शिरच्छेद केला गेला, किंवा काश्मीरमध्ये डीएसपी अयूब यांना जमावाने ठेचून मारले, तेव्हा कुठे दडून बसले होते हे नॉट इन माय नेम वाले ?...


या प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी नाही. पण या पद्धतीचं आंदोलन करणाऱ्यांची वृत्ती, बुद्धीजीवी म्हणविणाऱ्यांच्या दुटप्पी भूमिका मला मानवत नाही. खरं तर इंटेलेक्चुअल नावाच्या प्राण्याविषयी मला विलक्षण कोडं आहे. अभ्यासक, एक्सपर्ट हे मी समजू शकतो. पण बुद्धीजीवी कोण?एखादं पुस्तक, एखादा पुरस्कार यानं एकाएकी माणूस बुद्धीजीवी होतो? ही तथाकथित बुद्धीजीवी मंडळी सोयीस्करपणे एखादी अतार्किक बाजू घेत कोणावरही टीका करून मोकळी होतात. यांच्या संकल्पनाही कँडल मार्चसारख्या पाश्चात्य अंगानं जातात.मला ही उथळ आणि फॅशन बनलेली अभिव्यक्ती वाटते. त्यामुळं मी या असल्या मार्चमध्ये वगैरे जायच्या फंदात पडत नाही. सरकार असहिष्णू आहे, असं जर जाहीरपणे ओरडून सांगता येत असेल, तर तशी मुभा आपल्याला देणारे सरकार सहिष्णू नाही का ?


आपल्याला खरं म्हणजे एखाद्या समूहाविषयी किंवा समाजातल्या विशिष्ट गटाविषयी तिरस्कार नसतो. माध्यमं आणि राजकारणी तो चेतवतात. धर्म कुठला, याचा आणि कायदा हातात घेण्याचा संबंधच काय? कोणीच कायदा हातात घेण्याचं कारण नाही. गुन्हा केला तर शिक्षा अटळ आहे, हा धाक जोवर नाही, तोवर कायदा हातात घेणाऱ्यांना पायबंद घालणं अवघड आहे. आपल्यासारख्या लोकशाहीत म्हणून तर हा प्रश्न सुटत नाही.


बरं केंद्र सरकारनंही सुरुवातीलाच एक मोठी कम्युनिकेशन गॅप म्हणा, एरर ठेवली. बंदी बीफवर नसून ती गोवंश हत्याबंदी आहे, हे सरकारनं नेमकेपणानं स्पष्ट करायला हवं होतं. म्हणजेच रेडा, म्हैस यांना हा कायदा लागू नसल्याचं सांगितलं असतं, तर संभ्रमाला जागाच राहिली नसती. असो. पण त्याच संभ्रमातून सामूहिक मानसिकतेतून उफाळणाऱ्या हिंसेला वाव मिळाला. अशा हिंसेला रंग नसतो. तिचे समर्थन तर होऊच शकत नाही.


अशा सामूहिक हिंसेच्या बाबतीत...महात्मा गांधींच्या देशात हे होता कामा नये, हे वाक्य उच्चारायला ठीक आहे. पण हे रोखायचं कसं, याचं उत्तर आज माझ्यापाशी नाही. कठोर कायदा हा एकच उपाय मला दिसतो. पण त्यात लोकशाही आडवी येणार आणि तसे कायदे करायचेच झाले तर नॉट इन माय नेमचे बोर्ड गल्लीबोळात झळकणार!
 

Web Title: I said, not in my name ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.