Join us

Sanjay Raut: 'मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, मग आता...'; संजय राऊतांचा निर्धार, एकनाथ शिंदेंना थेट आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 7:53 AM

Sanjay Raut: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे पोहचले. त्यावेळी त्यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांनी त्यांचं स्वागत केलं. संजय राऊत यांनी यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं

मुंबई- गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ आर्थर रोड कारागृहात असलेले ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते संजय राऊत व त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणात विनाकारण गोवले असून, त्यांना बेकायदा अटक केल्याचे निरीक्षण विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी नोंदविले आणि दोघांचीही जामिनावर सुटका केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट असून, संजय राऊत यांना तुरुंगात टाकून ईडीने विशिष्ट लोकांनाच अटक करण्याचे धोरण राबविले आहे, अशा कडक शब्दांत विशेष न्यायालयाने ईडीला फटकारले.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे पोहचले. त्यावेळी त्यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांनी त्यांचं स्वागत केलं. संजय राऊत यांनी यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मला याच रस्त्यावरुन अटक करुन घेऊन गेले होते. त्यावेळीही मी सांगितलं होतं, की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. या पुढे महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना राहिल, असं संजय राऊत म्हणाले. तसेच मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, आता शिवसेनेचे १०३ आमदार निवडून आणणार, असं निर्धार व्यक्त करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे.

बाहेर काय सुरू होतं, ते आत राहून कळतं नव्हतं. बाहेर येऊन समजतंय की, आता उद्धव ठाकरेंचीशिवसेना झाली आहे. पण, एकच शिवसेना खरी आहे, बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना, बाकी सगळे धोत्र्याच्या बिया आहेत, अशी टीकी संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली. तसेच आमचा कणा मोडलेला नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, लढत राहू, असंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं त्यांचं हे तात्पुरतं राजकारण सुरू आहे. आता बाहेर आलोय, हळुहळू कामाला लागू. गेल्या ३०-३५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांचा भगवा फडकत आहेत, तो तसाच फडकत राहणार, असा विश्वासही संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी जामिनावर सुटका केली. या आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी होती. पण दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय मी आदेश देऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी त्वरित स्थगिती देण्यास नकार दिला. केंद्रीय तपास यंत्रणेच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेऊ. या सुनावणीनंतर जर जामीन रद्द केला, तर आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले जाऊ शकते, असेही न्या. डांग्रे म्हणाल्या. 

पीएमएलए न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे-

  • विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीच्या बदलत्या भूमिकेचीही नोंद यावेळी घेतली. सुरुवातीला ईडीने याप्रकरणी राकेश, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत हे मुख्य आरोपी असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांना या प्रकरणात मुख्य आरोपी केले, यावर निकालपत्रात बोट ठेवले आहे. 
  • म्हाडाची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद आहे. २००६-२०१३मध्ये घडलेल्या घटनेबाबत त्यांनी २०१८मध्ये तक्रार केली. मात्र, अद्याप ईडीने त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आरोपी केले नाही.
  • वाधवान यांनी स्पष्टपणे त्यांचा गुन्हा कबूल केला. तरीही त्यांना मोकळे सोडण्यात आले. यावरून ईडीची असमान वागणूक व काही लोकांना निवडून त्यांच्यावर कारवाई करण्याची वृत्ती दिसून येते. दोन्ही आरोपींचा जामीन मंजूर न करण्याची ईडी व म्हाडाची मागणी मान्य केली, तर न्यायालयाने त्यांच्या या वृत्तीवर शिक्कामोर्तब केल्यासारखे होईल.
टॅग्स :संजय राऊतएकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरेशिवसेना