मुंबई – महाराष्ट्रात सरकारचं कुठेही अस्तित्व दिसत नाही. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतो. राज्यातील जनता होरपळतेय. पण त्यांच्या प्रश्नाकडे पाहण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. जनतेचा विचार करत नाही. उद्धव ठाकरेंना कुणीही मुख्यमंत्री मानायला तयार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकारचं नाव लिहिलं जाईल असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना सरकारला लगावला आहे.
भाजपाच्या कार्यकारणीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशद्रोह्यांसोबत पार्टनरशिप या राज्याचा मंत्री करतो. एकदा भ्रष्टमार्गाने चालण्याची सवय नोकरशाहीला लागली तर ती पुन्हा पुर्वपदावर लवकर येत नाही. ज्या बदल्या केल्या जात आहेत. कोटी कोटी देऊन बदल्या पोस्टिंग केली जात आहे. आपल्या काळात जलयुक्त शिवार, मेट्रो, डिजिटल इंडिया, उद्योगावर चर्चा करायची. पण या सरकारच्या काळात हर्बल तंबाखू, वसुली, स्थगिती, बलात्कार, खंडणी यावर चर्चा होते. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारचं नाव लिहिलं जाईल. प्रत्येक विभागात एक वाझे आहे. सरकार सामान्यांसाठी नव्हे तर ते कायद्याचे नाही तर काय द्यायचे राज्य सुरु आहे. हजारो कोटींची वाटमारी सरकारकडून सुरु आहे. पण सामान्य शेतकऱ्यांकडे पाहायला कुणी तयार नाही असं त्यांनी सांगितले.
ही लढाई समोरुन लढावी लागते. पूर्ण ताकदीनं लढावी लागते. आम्हाला कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामीही नाही. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. ज्या दिवशी मुख्यमंत्रिपद सोडलं. ५ वर्षांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडलो त्यानंतर मुंबईत घर नव्हतं. ४ महिने भाड्यानं घर घेऊन राहिलो. विरोधी पक्षनेत्याचं निवासस्थान मिळेपर्यंत भाड्याच्या खोलीत राहिलो असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नवाब मलिकांना दिलं आहे.
नरेंद्र मोदींनी कधीही भेदभाव केला नाही
नरेंद्र मोदींनी कधीही भेदभाव केला नाही. महाराष्ट्रातील सरकार रोज केंद्राला शिव्या देतं पण मोदींनी कधी त्याचा विचार केला नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झालं मग त्या लसी कुणी दिल्या? त्या लसी नरेंद्र मोदींनी दिल्या. २८० दिवसांत मोदींच्या नेतृत्वात १०० कोटी लोकांचं लसीकरण झालं. जगात भारत सगळ्यांच्या पुढे आहे. मुख्यमंत्र्यांसोबत २१ बैठका घेतल्या. मग कमी कोण पडतंय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
आपलं सरकार आलं तर बोनस, नाहीतर...
या सरकारच्या विरोधात सर्व लोकांना एकत्रित करुन लढा उभा करायचा आहे. महाविकास आघाडी सरकारनं सगळ्यांसोबत विश्वासघात केला आहे. सामान्य माणसांची ताकद काय असते हे दाखवून देऊ. अर्ध्या मनानं लढाईला उतरायचं नाही. सरकार आलं तर बोनस. पण जनतेसाठी लढायला उतरायचं. लोकशाहीनं ज्या आंदोलनाचा अधिकार दिला ते आपलं शस्त्र आहे. जनतेचा मोदींवर विश्वास ती आपली शिदोरी. जनतेच्या कल्याणासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपा महाविकास आघाडीला पाणी पाजू. आगामी निवडणुकीत भाजपा स्वबळावर सरकार येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.