Join us

मी विचारांवर ठाम; चौकशी समितीसमोर उत्तर देईन, योगेश सोमण यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 6:22 AM

मी माझ्या विचारांवर ठाम आहे. सावरकर यांच्यावर मी विचार मांडले. ते व्यक्त करताना मी कोणाला विचारलेले नव्हते. मग, माझ्या विचार व्यक्त करण्यासंदर्भात मी कोणाला उत्तर का देऊ?

पुणे : मी माझ्या विचारांवर ठाम आहे. सावरकर यांच्यावर मी विचार मांडले. ते व्यक्त करताना मी कोणाला विचारलेले नव्हते. मग, माझ्या विचार व्यक्त करण्यासंदर्भात मी कोणाला उत्तर का देऊ? सत्ताकारण आणि राजकारण या पलीकडे जाऊन मी माझे म्हणणे मांडले होते. आता काय उत्तर द्यायचे ते मी मुंबई विद्यापीठाच्या चौकशी समितीसमोर देईन, अशी स्पष्ट भूमिका प्रसिद्ध नाट्यकर्मी आणि मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे संचालक योगेश सोमण यांनी बुधवारी पुण्यात मांडली.मुंबईच्या विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालक पदावर कार्यरत असताना सोमण यांनी राहुल गांधी यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर टिप्पणी केली होती. त्यातून झालेल्या वादातून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. भारतीय कामगार सेना आणि चित्रपट सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक महोत्सवात’ सोमण यांचे अभिनय या विषयावर शिबिर आयोजित केले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मी काहीच बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर भाष्य टाळले.सोमण म्हणाले, मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालक पदावरुन सक्तीच्या रजेवर पाठविण्यासंदर्भात मी बोलणार नाही. मी त्यावर अधिकृत भूमिका स्पष्टपणे विद्यापीठाकडे मांडणार आहे. मी माझ्या विचारांवर ठाम आहे. कलाकाराला व्यक्त होण्याचे बंधन नसते.मी सावरकरवादी आहे. मी माझी भूमिका ठामपणे वेळोवेळी मांडलेली आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही. नाटक शिकवण्यासाठी कोणत्याही पक्षाचे निमंत्रण आले, तर मी नक्की जाईन. शिवसेनेच्या सांस्कृतिक महोत्सवात माझ्या येण्याला कोणत्याही पक्षाचा रंग देऊ नये.- योगेश सोमण, संचालक नाट्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ

टॅग्स :मुंबई विद्यापीठमुंबई