Video : मी समाधान आवताडे शपथ घेतो की..; पंढरीच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 01:00 PM2021-05-12T13:00:00+5:302021-05-12T13:02:49+5:30
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांचा मुंबईत पार पडलेला शपथविधी कार्यक्रम पार पडला.
मुंबई - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान अवताडे यांनी विजय मिळवला. (Pandharpur Election Results )अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव केला. या विजयानंतर समाधान अवताडे यांनी हा विजय जनतेला समर्पित केल्याचे म्हटले. विजयानंतर आवताडे यांनी आज मुंबईत जाऊन आपल्या आमदारकीची शपथ घेतली. (This victory belongs to the people, Samadhan Avtade's reaction after the victory)
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांचा मुंबईत पार पडलेला शपथविधी कार्यक्रम पार पडला. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आवताडेंना गोपनियतेची शपथ दिली. यावेळी, भाजप आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासह भाजपा नेते उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे सध्या मोठ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच, यापूर्वीचं अधिवेशनही ठराविक काळापूरतंच घेण्यात आलं होतं. त्यामुळे, समाधान आवताडे यांचा शपथविधी सोहळाही मोजक्यात लोकांमध्ये घेण्यात आला.
मी समाधान आवताडे शपथ घेतो की..; पंढरीच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ pic.twitter.com/QS8rgcHPTE
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2021
मी समाधान आवताडे शपथ घेतो की... असे म्हणत आवताडे यांनी पहिल्यांदाच आमदारकीची शपथ घेतली. तत्पूर्वी, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत विजयी घोषित करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समाधान अवताडे लोकांची तादक आमच्या पाठीशी होती. हा विजय जनतेचा आहे, असे त्यांनी म्हटले होते. तसेच, निवडणुकीदरम्यान, महाविकास आघाडीकडून जनतेवर दबाव होता. महाविकास आघाडीने अनेक गोष्टींचा वापर केल्याने माझे मताधिक्य कमी झालं आहे, असेही अवताडे यांनी सांगितले.
विजयाचं श्रेय भाजपा नेत्यांना
दरम्यान, पंढरपूरच्या तुलनेत मंगळवेढ्यामधून कमी मताधिक्य मिळालं का, असं विचारलं असता दोन्ही तालुक्यांमधून आपल्याला मताधिक्य मिळाल्याचे सांगितले. तसेच या विजयामागे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या इतर अनेक नेत्यांचे योगदान आहे. त्यांनी साथ दिल्याने हा विजय झाला, असे अवताडे यांनी सांगितले.