मुंबई : लोकलेखा समितीपासून विधिमंडळाची एकही समिती गेले कित्येक महिने झाले तरी तयार होऊ शकली नाही. याबद्दलची हतबलता दस्तुरखुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वत: मंगळवारी सभागृहात व्यक्त केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी या बाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. विधिमंडळाच्या विविध समित्यांचे काम महत्त्वाचे असते. नवीन आमदारांना तर त्याचे स्वरूच कळायलाच हवे पण अद्याप समित्यांची स्थापना झालेली नाही याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. त्यावर अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे अशा कामांना विलंब होत आहे.
समित्यांच्या सदस्यांची नावे माझ्याकडे येतात मग ती वगळा, नवीन नावे घ्या असे कळविले जाते. त्यामुळे मी आधी नावे घेतो, मग वगळतो असेच चालले आहे. तरीही विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपल्याबरोबर या समित्या घोषित करण्यात येतील.