मुंबई : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे नेते आणि भायखळा येथील माजी आमदार वारिस पठाण यांच्या 'आपण 15 कोटी, ते 100 कोटी', या विधानावरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता वारिस पठाण यांनी या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते विधान मागे घेतो, असे म्हटले आहे. मुंबईतीत वारिस पठाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. माझे विधान सीएए कायदा आणणाऱ्यांविरोधात होते. ते विधान तेढ निर्माण करण्यासाठी करण्यात आले नाही. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी सर्व धर्माचा आदर करतो. माझ्या कोणत्याही शब्दाने कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी ते शब्द मागे घेतो, असे यावेळी वारिस पठाण म्हणाले. तसेच, फक्त 100 लोक या देशात असे आहेत की जे मुस्लीम समाजाविरोधात आहेत, अशा भाजपा, आरएसएस, बजरंग दल या संघटनांच्या 100 लोकांविरोधात मी ते वक्तव्य केले होते, असे म्हणत वारिस पठाण यांनी भाजपावर निशाणा साधला. याचबरोबर, वारिस पठाण यांच्यासोबत एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील सुद्धा उपस्थित होते. यावेळी देशात चर्चा करावेत असे अनेक मुद्दे आहेत, त्यामुळे माध्यमांनी आता हा विषय संपवावा, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)विरोधात आंदोलने सुरू आहेत. सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीत असलेल्या शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून मुस्लिम महिलांनी ठिय्या दिला आहे. यावरुन वारिस पठाण यांनी मुस्लिमांना चिथावणी देणारे विधान केले आहे. आम्ही 15 कोटी आहोत. पण 100 कोटींना भारी पडू, असे वारिस पठाण यांनी म्हटले आहे.
वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केले. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'आपल्याला स्वातंत्र्य मिळवावे लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असे ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले. दरम्यान, वारिस पठाण यांच्या या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर महत्त्वाची बैठक, शरद पवारही उपस्थित
शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला घर चालवण्याचा वेगळा 'मंत्र'
'त्या' तरुणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; मी एकटी नाही, फक्त चेहरा आहे माझ्यामागे तर...
संपूर्ण देशात एनआरसी लागू न करण्याचे मोदींनी आश्वासन दिले : उद्धव ठाकरे