मला वाटलं, मी मरते की काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 10:26 AM2023-04-10T10:26:32+5:302023-04-10T10:26:42+5:30

नववीत असताना मला पहिल्यांदा आकडी आली. मला काय झालंय हे कळायच्या आत मी खाली पडले होते. नंतर मला वारंवार असा त्रास व्हायला लागला.

I thought, am I going to die or what? | मला वाटलं, मी मरते की काय?

मला वाटलं, मी मरते की काय?

googlenewsNext

नाझिया अन्सारी

नववीत असताना मला पहिल्यांदा आकडी आली. मला काय झालंय हे कळायच्या आत मी खाली पडले होते. नंतर मला वारंवार असा त्रास व्हायला लागला. एकदा तर अगदी प्राण कंठाशी आले होते. मी मरते की काय, असे मला वाटत होते. माझ्या शेजारच्यांनी मला बॉम्बे हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला. तिथे एमआरआय आणि डोक्याची ईईजी चाचणी करण्यात आली. त्यातून मला एपिलेप्सीचा (अपस्मार)  त्रास असल्याचे निदान झाले. 
 
हा दीर्घकालीन आजार आहे. या आजारात मोठ्या आवाजाचा त्रास सहन होत नाही. ड्रायव्हिंग करू शकत नाही. साहसी खेळ खेळता येत नाहीत. या सगळ्या प्रकारामुळे मेंदूवर ताण येऊन एपिलेप्सीचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. आज मी ३१ व्या वर्षी दररोज चार गोळ्या घेते.  मला त्यानंतर कुठलीही आकडी आली नाही. मात्र, त्यासाठी पथ्य आणि डॉक्टरांनी सांगितलेले नियम पाळणे गरजेचे असते. या सर्वांचे श्रेय मी माझे डॉक्टर मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. निर्मल सूर्या यांना देते. ते फक्त तुमच्यावर उपचार करत नाही तर तुम्हाला जगण्याची नवीन उमेद देतात. 

आपल्याकडे एपिलेप्सीबद्दल खूप गैरसमज आहेत.  मात्र, औषधोपचाराने हा आजार नियंत्रणात राहू शकतो. तसेच सर्वसाधारण आयुष्य रुग्णाला जगता येते. मात्र, त्याकरिता नियमितपणे औषध घेणे गरजेचे असते. कारण ही औषधे खूप काळासाठी घ्यावी लागतात. या आजारात चेतासंस्थेतील बिघाडामुळे रुग्णाला झटके किंवा आकडी येते. काही वेळेला व्यक्ती बेशुद्धसुद्धा होते. याकरिता योग्य डॉक्टरांकडून निदान आणि त्याचे उपचार घेणे गरजेचे ठरते. 
मी या आजाराच्या जनजागृतीसाठी नेहमीच सक्रिय असते. राज्यातील एपिलेप्सी विविध आरोग्य शिबिरांना मी हजेरी लावते. रुग्ण आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधते. या आजाराबद्दलचे गैरसमज समुपदेशनाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियामार्फत मी अनेक रुग्णांशी संपर्कात आहे. त्यांना योग्य ती माहिती पुरविण्याचे काम करत आहे.

दरवर्षी, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ एपिलेप्सी, लंडन येथील या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे या आजाराच्या जनजागृतीसाठी तसेच या रुग्णांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांना उत्तम आयुष्य लाभावे, यासाठी ही संस्था काम करत असते. तसेच या संस्थेतर्फे दरवर्षी विविध देशांतील अशा रुग्णांना सन्मानित करण्यात येते, जे रुग्ण दुसऱ्या रुग्णांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतात. त्यामध्ये २०२२  वर्षीचा गोल्डन लाइट पुरस्कार मला जाहीर झाला आहे. तसेच कम्युनिटी काउन्सिलर म्हणून या संस्थेत माझी निवड करण्यात आली आहे. मी सध्या बँकेत काम करत असून नियमित औषधाेपचाराने माझे दैनंदिन आयुष्य जगत आहे.  
(शब्दांकन : संतोष आंधळे)

Web Title: I thought, am I going to die or what?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.