#KamalaMillsFire: माझीही ‘केस स्टडी’ झाली असती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:16 AM2017-12-30T02:16:19+5:302017-12-30T02:17:49+5:30

नेहमीप्रमाणे मी गुरुवारी रात्रीच्या शिफ्टला (टीव्ही-९ चॅनेल) आॅफिसमध्ये पोहोचलो. कामामध्ये व्यस्त असताना काही वेळात १२.२५ च्या सुमारास ‘आॅफिसमधून बाहेर निघा’ ओरडत एक व्यक्ती आॅफिसमध्ये आली.

I too would have been a 'case study' | #KamalaMillsFire: माझीही ‘केस स्टडी’ झाली असती

#KamalaMillsFire: माझीही ‘केस स्टडी’ झाली असती

Next

- मनोज सातवी
नेहमीप्रमाणे मी गुरुवारी रात्रीच्या शिफ्टला (टीव्ही-९ चॅनेल) आॅफिसमध्ये पोहोचलो. कामामध्ये व्यस्त असताना काही वेळात १२.२५ च्या सुमारास ‘आॅफिसमधून बाहेर निघा’ ओरडत एक व्यक्ती आॅफिसमध्ये आली. नेमकं काय झालंय हे कळायला मार्ग नव्हता. टीव्ही९ चं आॅफिस बेसमेंटला असल्यानं बाहेरची परिस्थिती पटकन लक्षात आली नाही. नेमकं बाहेर काय झालं आहे याचा आवाजही ऐकू येत नव्हता. मात्र आपल्या आॅफिसच्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये मोठी आग लागली असल्याचं कळालं. तसं आम्ही सगळे आॅफिसमधून बाहेर निघण्यासाठी मुख्य दाराकडे आलो. मात्र तिथून बाहेर निघणं शक्य नव्हतं. कारण जळते बांबू आणि सजावटीचं सामान (रेस्टॉरंटमध्ये वापरलेलं) इतर ज्वलनशील वस्तू वरून जळतच खाली पडत होत्या. त्यामुळे आमचा बाहेर निघण्याचा मार्ग बंद झाला होता. काय करावं सुचत नव्हत. जवळपास १५-२० जण आम्ही आॅफिसमध्ये होतो. अखेर आॅफिसच्या मागच्या बाजूला असणाºया इमर्जन्सी दरवाजाने आम्ही सर्व बाहेर पडलो.
मात्र बाहेर आल्यानंतर बाहेरचं दृष्य पाहून धक्काच बसला. आॅफिसच्या वर असलेलं, नेहमी रेलचेल असणारं रेस्टॉरंट आगीच्या भक्षस्थानी गेलं होत. तिथे रेस्टॉरंटच्या ऐवजी फक्त आग दिसत होती. आगीचे डोंब आकाशात उडत होते. सगळीकडे धूरच धूर होता. बाहेर पडल्यावर आधी मी अग्निशमन दलाला फोन केला आणि आग लागल्याची माहिती दिली, त्यांना आधीच फोन गेला असल्यानं गाड्या निघाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. बाहेर मोठी गर्दी जमली होती. धक्कादायक गोष्टी म्हणजे आगीत अडकलेल्या लोकांच्या किंचाळ्या खाली स्पष्ट ऐकू येत होत्या, मात्र आम्हीही काही करू शकत नव्हतो. दरम्यान १-२ सिलिंडरचे स्फोटही झाले. सिलिंडरच्या स्फोटानंतर एवढ्या लांब उभं असूनही आमच्या चेहºयावर उष्ण वाफेचा हलका चटका बसला. खबरदारी म्हणून आम्हाला रेस्टॉरंटच्या बिल्डिंगखालून पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी हटवलं आणि थोडं लांब उभं राहण्यास सांगितलं.
काही वेळाने आमच्या लक्षात आलं की आमच्या आॅफिसमधील हाउस किपिंगमध्ये काम करणारा सहकारी पांडू बाहेर दिसत नव्हता. त्याला बराच वेळ शोधल्यानंतर तो तेथे दिसला नाही म्हणजे तो आतच असल्याचं आम्हाला कळालं. मग एका अग्निशमन दलाच्या जवानाला याबाबत मी सांगितलं आणि त्यांना घेऊन पुन्हा पांडूला शोधण्यासाठी आम्ही आत शिरलो. मोठ्या हिमतीनं आत शिरलो, खरं पण बाहेरून आगीचं दृश्य पाहिलं होतं. त्यामुळे डोक्यावर असलेल्या आगीतून परत बाहेर येऊ की नाही याची भीती मनात होती. आॅफिसमध्ये लाइट बंद केल्याने सर्वत्र अंधार होता. मोठ्या प्रमाणावर धूर तेथे झाला होता. अखेर धुरातून आणि अंधारातून बॅटरीच्या मदतीनं रस्ता काढत पांडूला मोठ्याने आवाज देत आम्ही आॅफिसमध्ये फिरत होतो. त्या वेळी गोळ्या खाल्ल्या असल्याने पांडू एका ठिकाणी झोपला होता. तेथून पांडूला उठवून त्याला घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर अद्याप परिस्थिती तशीच होती. अग्निशमन दलालाही आग विझवण्यात अडचणी येत होत्या. शिडीच्या मदतीनं अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. अर्धे कपडे भिजलेल्या अवस्थेत मी रात्रभर बाहेर उभा होतो. हे सगळं भयाण दृश्य मी जवळून पाहिलंय हे कळताच जितू राजपासून अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी चॅनेल्सनी माझी प्रत्यक्षदर्शी म्हणून प्रतिक्रिया घेतली. मात्र मनात एकच भीती कायम होती, काही विपरीत घडले असते तर माझीही ‘केस स्टडी’ झाली असती.
प्रत्यक्षदर्शी (पत्रकार टीव्ही९)

Web Title: I too would have been a 'case study'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.