मुंबई - राज्यातील राजकीय नाट्यमय घडामोडी अद्यापही पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होत आहे. दुसरीकडे मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना अनेक घडामोडींवर भाष्य केलं. त्यावेळी, आम्ही आजपर्यंत केलेली सर्वच आंदोलन यशस्वी झाली आहेत. मग, ते टोलचं आंदोलन असो किंवा भोंग्याचं आंदोलन असो. भोंग्याच्या आंदोलनानंतर 90 टक्के भोंगे बंद झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. तसेच, नुपूर शर्मा प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं.
राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी करताना नुपूर शर्माचे समर्थन केलं होतं. आता, पुन्हा एकदा त्यांनी नुपूर शर्माच्या विधानाचं समर्थन करत त्यांनी माफी मागायची काही गरज नसल्याचा पुनर्उच्चार केला. तसेच, नुपूर शर्माचे समर्थन करताना झाकीर नाईकच्या भाषणांची आठवण करुन दिली. झाकीर नाईक आपल्या हिंदू देवदेवतांचा अवमान करतो, त्यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करतो त्यावर कोण बोलत नाही. झाकीर नाईकला कोणी माफी मागायला लावत नाही. दुसरीकडे ते औवेसी भाऊ, आपल्या देवी-देवतांच्या नावावरुन हेटाळणी करतात. ओ कैसे.. कैसे... ना रखे है, असे म्हणतो, असे म्हणत राज यांनी नुपूर शर्माचे मी समर्थन करत असल्याचं सांगितलं.
यापूर्वीही राज ठाकरेंनी मांडली होती भूमिका
वास्तविक पाहता नुपूर शर्मांनी माफी मागण्याची गरज नव्हती. जे काय त्यांनी ऐकलं होतं ते त्या बोलल्या. ओवेसी आपल्या देवदेवतांवर वादग्रस्त टीका करतात. ते कधी माफी मागतात का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. काही देश देव-देवतांचा अपमान करतात, त्यांनी कधी माफी मागितली का असाही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.