अपघात फक्त कमी करायचे नाहीएत; मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवाय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By मोरेश्वर येरम | Published: January 18, 2021 06:54 PM2021-01-18T18:54:40+5:302021-01-18T18:58:27+5:30
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत रस्ता सुरक्षा अभियानेचे उदघाटन झाले.
महाराष्ट्र राज्य सध्या रस्ते अपघातात देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याबाबत नाराजी व्यक्त करतानाच येत्या काळात महाराष्ट्र अपघामुक्त करायचा असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत रस्ता सुरक्षा अभियानेचे उदघाटन झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकास आणि अपघातांवर भाष्य केलं. "मला अपघाताची आकडेवारी कमी नाही करायची, तर मला या यादीत महाराष्ट्राचे नाव नकोच आहे. मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले. यासोबतच "रस्ते सुरक्षा हा आठवडा किंवा महिन्यापुरता मर्यादित न राहता ही जीवनशैली व्हावी", असंही ते पुढे म्हणाले.
नियम आणि संयम...दोन्ही शब्दांत 'यम'
"नियम आणि संयम या दोन्ही शब्दांत यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला. तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अपघात स्थळांचा शोध घेऊन तिथे ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी
राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
"अपघात होऊच नयेत म्हणून प्रयत्न व्हावेत. धोक्याचे वळण, अपघाताच्या जागा लक्षात घेऊन ट्रॉमा केअर उभारण्यात यावेत. दुर्दैवाने अपघात झाला तर जीव वाचवण्यासाठी प्रयत्न आणि सुविधा हवी. वाहन चालवण्याच्या प्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सगळे नियम आणि शिस्त याची माहिती हवी. तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.