मलाही कोरोनाला हरवायचे आहे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:12 AM2021-08-17T04:12:16+5:302021-08-17T04:12:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - कोरोनाच्या काळात गेली साडेचार वर्षे अंथरुणाला खिळून असणाऱ्या ६७ वर्षीय आजीनेही कोरोनाला हरविण्याची जिद्द ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोनाच्या काळात गेली साडेचार वर्षे अंथरुणाला खिळून असणाऱ्या ६७ वर्षीय आजीनेही कोरोनाला हरविण्याची जिद्द सोडली नव्हती, अशीच काहीशी प्रचिती महापालिका अधिकाऱ्यांना आली. पालिकेच्या लसीकऱण मोहिमेदरम्यान अडीच आठवड्यांपासून लसीकरणासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या अंधेरीच्या इंदुमती (नाव बदललेले) यांनी अखेर कोरोनाला हरविल्याचा सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या लसीकरणादरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांच्याही मनात लस दिल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
आजीच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजींना अर्धांगवायूचा झटका आला आहे. मागील काही वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून आहेत. कोरोनाचा संसर्गाचा काळ हा अत्यंत आव्हानात्मक होता, घरातील तीन सदस्य कामानिमित्त बाहेर असायचे. अशा काळात त्यांना संसर्गाचा धोका होता. परंतु, सुदैवाने त्यांना कोणताही त्रास झाला नाही. कोरोनाच्या दोन्ही लाटांदरम्यान केवळ दोन वेळा साधारण व्हायरल ताप येऊन गेला, त्यावेळेसही आजींनी औषधोपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. जगण्याची जिद्द सोडली नाही. त्यांच्याकरिता लसीकऱण सुरू केल्याचे कळल्यानंतर त्वरित आमच्या मागे लसीकरणासाठी तगादा लावला होता. त्यामुळे अखेर अडीच आठवड्यांनी लसीकरण सुरळीत पार पडले. त्यानंतर फार काही त्रास झाला नाही.
आजींना लसीकऱणाविषयीच्या अनुभवाविषयी विचारले असता, कोरोनाचा काळ हा खडतर होता, माझ्यासारख्या लोकांचे आयुष्य आधीच अर्धमेले झालेले असते, पण मी मात्र जगण्याची उमेद हरले नव्हते. लस घेतल्यानंतर आता आशावाद कायम आहे. मुंबई लसीकरण अधिकारी आणि उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप यांनी सांगितले की, कोणीही लसीपासून वंचित राहू नये, हे आमचे ध्येय आहे. म्हणूनच आम्ही लोकांच्या वेगवेगळ्या विभागांसाठी वेळोवेळी लसीकरण मोहीम सुरू केली. भविष्यातही अधिकाधिक मुंबईकरांना लसीकरण करणे हे आमचे ध्येय असेल. मुंबईत सुमारे ४५०० लोक असे आहेत, जे आजारपणामुळे अंथरुणावरून उठण्यास असक्षम आहेत. अशा परिस्थितीत नगरपालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम सुरू केली, ज्याअंतर्गत २००४ लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आतापर्यंत पालिकेतील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने लसीकरण केले आहे. यापैकी, १९६२ जणांना पहिला आणि ४२ नागरिकांचे दोन्ही डोस झाले आहेत.