मला न्यूझीलंडला जाऊन राहायचंय; तिथे 'देवी' जागृत आहे; केदार शिंदेंचा सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 09:57 AM2020-08-11T09:57:42+5:302020-08-11T10:00:54+5:30
न्यूझीलंडमध्ये मागील 100 दिवसांत एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही.
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 02 लाख 54,685 रुग्ण झाले असून त्यापैकी 1 कोटी 31 लाख 18,618 रुग्ण बरे झाले आहेत. पण, 7 लाख 38,930 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्यानं वाढत आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतातील रुग्णसंख्या 22 लाख 67,153 वर पोहोचली आहे. त्यापैकी 15 लाख 81,640 रुग्ण बरे झाले असून 45,353 जणांचे निधन झाले आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची आकडेवारी रोज वाढत असताना एक दिलासादायकही बातमी समोर आली. न्यूझीलंडमध्ये मागील 100 दिवसांत एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. त्यावरून मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सरकारला टोला लगावला आहे.
कोरोनामुक्त होण्याचा मान न्यूझीलंडनं पटकावला होता, परंतु प्रवासबंदी हटवल्यानंतर तेथे पुन्हा कोरोना रुग्ण सापडले आणि त्यानंतर पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांच्या सक्षम नेतृत्वामुळे आणि योग्य धोरणांमुळे हे शक्य झाल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. केदार शिंदे यांनीही जॅसिंडा आर्डेन यांचं कौतुक करणारं ट्विट केलं आणि त्यावरून त्यांनी सरकारला टोमणाही हाणला. त्यांनी लिहिलं की,''मला न्यूझीलंड इथे जाऊन रहायचयं. कसं शक्य माहीती नाही. या १०० दिवसात तिथे एकही कोरोना बाधित रूग्ण नाही. महिला पंतप्रधान आहे. देवी तिथे जागृत आहे. आम्ही इथे फक्त 'बेटी पढाव, बेटी जगाव'चे फतवेच काढणार!''
मला #NewZealand इथे जाऊन रहायचयं. कसं शक्य माहीती नाही. या १०० दिवसात तिथे एकही #Corona बाधित रूग्ण नाही. महिला पंतप्रधान आहे. देवी तिथे जागृत आहे. आम्ही इथे फक्त #बेटीपढावबेटीजगाव चे फतवेच काढणार!!!
— Kedar Shinde (@mekedarshinde) August 10, 2020
केदार शिंदे यांच्या ट्विटनंतर त्यांना ट्रोल केलं गेलं. त्यांनाही केदार शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यांनी लिहिलं की,''काही लोकांच्या मेंदूचा केमिकल लोच्या झालाय. तिरकसपणा या विषयी काहीच माहीती नसावी.एखादी पोस्ट टाकली की उत्तरादाखल हे बुध्दीचं प्रदर्शन मांडणार. एक मोबाईल, आईबापाने भरलेला फ्री डाटा, भक्तीची डोळ्यावर पट्टी बांधून यांची मोबाईलवर बोटं फिरतात! कृष्ण जन्मून मर्दन करावं आता!''
काही लोकांच्या मेंदूचा chemical लोच्या झालाय. Sarcasm, तिरकसपणा या विषयी काहीच माहीती नसावी.एखादी पोस्ट टाकली की उत्तरादाखल हे बुध्दीचं प्रदर्शन मांडणार. एक मोबाईल, आईबापाने भरलेला free data, भक्तीची डोळ्यावर पट्टी बांधून यांची मोबाईलवर बोटं फिरतात! #कृष्ण जन्मून मर्दन करावं आता!
— Kedar Shinde (@mekedarshinde) August 11, 2020
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिस व बिहार पोलिस आमने-सामने उभे ठाकले आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला आहे. अशात मुंबई पोलिस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा एक आरोप सतत होत आहेत. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती.
''आता बास्स झालं. मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात. सतत तुमच्या विषयी नकारात्मक बातम्या सुरु आहेत. कुणीही येतंय आणि टिकली वाजवून जातंय. तोंडावर त्यांना पुरावे देऊन या. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा समारोप करा! तुमच्यावर आम्हाला गर्व आहे,'' असे ट्विट त्यांनी केले होते.
''सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याचं नक्कीच दु:ख आहे. त्याच्या केसचा छडा लावाच! पण या काही दिवसांमध्ये हिंदी/इंग्रजी/मराठी वृत्तवाहिन्यांवर फक्त त्याच्यावरचे एपिसोड पाहून चिंता वाटतेय. लोकांना वेगळ्याच घटनेत गुंतवून देशासमोरचे महत्वाचे विषय बाजूला सारले जात आहेत. हे जाणीवपुर्वक चाललंय का?,'' असाही सवालही केदार शिंदे यांनी उपस्थित केला होता.