Join us

मला काहीही करून मनसेला सत्तेत बसवायचेय! राज ठाकरेंनी केली २५० जागा स्वबळावर लढण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 5:57 AM

१ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २२५ ते २५० जागा लढवेल, अशी घोषणा करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी स्वबळाचा नारा दिला. १ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.  लोकसभा निवडणुकीत राज यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. 

अमेरिकेहून परतल्यानंतर राज यांनी गुरुवारी मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. ते म्हणाले, “युती होणार का, काय होईल, असे लोक तुम्हाला विचारतील. मी तुम्हाला सांगतो की, आपल्या पक्षाला मला सत्तेत काहीही करून बसवायचेच आहे. या वाक्यावर काही लोक हसतील तर हसू देत; पण, हे घडणार आहे.” 

मनसेची उमेदवारी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच दिली जाईल. तिकीट मिळाले की मी पैसा काढायला मोकळा, असे वाटणाऱ्याला तिकीट मिळणार नाही.  प्रत्येक जिल्ह्यात पाच जणांची टीम पाठवून एक सर्व्हेक्षण मी केलेले आहे. या टीम एक-दोन दिवसांत जिल्ह्यांत जातील. त्यांना नीट माहिती द्या, असे राज म्हणाले. 

लाडकी बहीण, भाऊ एकत्र असते तर...

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून राज यांनी चिमटे काढले. खड्डे बुजवायला पैसे नाहीत, या योजनांसाठी सरकारकडे पैसा आहे का, असा सवाल त्यांनी केला. लाडका भाऊ, लाडकी बहीण असे दोन्ही एकत्र आणले असते तर पक्षच फुटले नसते, अशी शाब्दिक कोटीही त्यांनी केली. 

जायचे तर खुशाल जा; लाल कार्पेट घालतो

आपल्या पक्षातील एक-दोन पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत, असे मी ऐकतो. खुशाल जा, मीच त्यांना लाल कार्पेट घालतो; पण, तुम्ही आपल्या भविष्याचा सत्यानाश करून घ्याल. ज्यांच्याकडे जाऊ इच्छिता तेच स्थिर नाहीत तर तुमचे ते काय करणार? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :राज ठाकरेमनसे