मुंबई – मुलुंड येथे मराठी महिलेला जागा नाकारल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता याबाबत पंकजा मुंडे यांनीही त्यांना आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. मुलुंडच्या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेत मनसेने संबंधित सोसायटीला जाब विचारत दोषींना मराठी माणसाची माफी मागायला लावली. तर यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे.
पंकजा मुंडे या प्रकरणी म्हणाल्या की, आत्तच्या राजकारणाचे वातावरण पाहता मनस्थिती खराब आहे. लोकांकडे साधने आहेत, परंतु अस्वस्थता वाटते. आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहेत. प्रत्येक रंगात माणूस वाटला गेला आहे. हिरवा, भगवा, निळा असे लोकं वाटले गेलेत. एका मराठी महिलेला जागा नाकारण्यात आली. खरेतर भाषा आणि प्रांतवादाच्या राजकारणात मला पडायला आवडत नाही. माझ्या राजकीय प्रवासात कधीही जातीयवाद, धर्मवाद आणि प्रांतवाद यावर टिप्पणी केली नाही. कुणी कोणत्या भाषेत बोलावे, कोणत्या भाषेत पाटी लावावी यावर मी बोलली नाही. परंतु एक मुलगी रडून तिच्यावर घडलेला प्रसंग सांगते हा प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत माझे सरकारी घर सोडून जेव्हा मला घर घ्यायचे होते तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला आहे. मराठी लोकांना घर देत नाही असं ऐकलं आहे. मी कोणत्या एका भाषेबद्दल बोलत नाही. मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषेने, धर्माने नटलेले आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथं प्रत्येकजण येतोय, परंतु आम्ही मराठी लोकांना घर देत नाही हे जर कोण बोलत असेल तर ते फार दुर्दैवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीलाही हा अनुभव आला आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी केवळ गणपतीचे विसर्जन न करता प्रत्येक नकारात्मक गोष्टीचे विसर्जन करायला हवे. जाती, धर्म, प्रांत या सगळ्या वादाचे विसर्जन करावे असं ठरवू शकत नाही का? माझी भूमिका कुणा एकासाठी नव्हे तर सर्वांनी एक व्हावे यासाठी आहे असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.