... तेव्हा मी २० दिवस तुरुंगात होतो, उद्धव ठाकरे कुठे होते?; महाजनांचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 01:21 PM2023-12-26T13:21:09+5:302023-12-26T13:22:16+5:30
या सोहळ्याला व्हीव्हीआयपी लोकांना बोलावण्यात आलं आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई - अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या येथील २४ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये देशभरातील अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर सोहळ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळालं नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. यावेळी, राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणीत शिवसेनेचं मोठं योगदान आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं. आता, यावर राज्याचे मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. तसेच, या सोहळ्याला व्हीव्हीआयपी लोकांना बोलावण्यात आलं आहे, असेही ते म्हणाले.
"उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला या सोहळ्याचं निमंत्रण नाही. या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं नसतं. कारण राम मंदिर उद्घाटन सोहळा हा श्रेय घेण्याचा एक भाग बनला आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणीत शिवसेनेचं योगदान फार मोठं आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान खूप मोठं आहे. थंड बासनात पडलेला प्रश्न उद्धव ठाकरे हे तिथं गेल्यामुळे पुन्हा समोर आला. मात्र, ते लोक आम्हाला बोलावणार नाहीत. कारण उद्धव ठाकरे तिथं गेल्यामुळे शिवसेनेचा जयजयकार होईल, बाळासाहेबांचा जयजयकार होईल," असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला होता. त्यावरुन, आता गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंचं काय योगदान, असा सवाल केला आहे.
उद्धव ठाकरेंनी १ कोटी रुपयांची देणगी दिली, तरीही त्यांना सोहळ्याला निमंत्रण का नाही, असा सवाल पत्रकाराने विचारला होता. त्यावर, कोटी-कोटी रुपये खूप लोकांनी दिले आहेत. केवळ कोटी रुपये दिले म्हणून त्यांना बोलवता येत नाही. खरं म्हणजे आमच्या नेत्यांनीही वारंवार सांगितलं की, त्यांचं काय योगदान आहे. मी दोनवेळा कारसेवेत गेलो होतो, २० दिवस तुरुंगात होतो. जेव्हा बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, तेव्हा त्यावेळीही मी तिथे होतो. उद्धव ठाकरे कोठे होते?, ते घरातच बसलेले होते, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच, श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न बोलावल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
तुम्हाला बोलावलं नाही, याचं तुम्हाला वाईट का वाटतं. तुम्ही साधे आमदार आहात, एमएलसी. तेही विधानसभेत कधी पाय ठेवत नाही, कधी येऊन बघत नाही. मग त्यांना अयोध्येला बोलावलं काय, किंवा नाही बोलावलं काय, कारण तिथे खूप मोठे व्हीव्हीआयपी येत आहेत. मला वाटतं शासनाच्यादृष्टीने उद्धव ठाकरे व्हीव्हीआयपी नसतील. म्हणूनच, त्यांना बोलावलं नसेल, असा खोचक टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला.