मुंबई - आर्यन खान क्रुझ ड्रग्जप्रकरणात काँग्रेस नेते आणि मंत्री अस्लम शेख यांचे नाव समोर आले होते. विशेष म्हणजे मंत्री नवाब मलिक यांनीही यासंदर्भात विधाने केल होते. आमच्या सरकारचे मंत्री अस्लम शेख यांनाही क्रुझवरील पार्टीचं निमंत्रण दिले गेले. परंतु ते गेले नाहीत. सेलिब्रेटींच्या मुलांना बोलावून त्यांना जाळ्यात अडकवण्याचं प्लॅनिंग होतं. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या मुलांनाही क्रुझवर नेण्यासाठी आग्रह करत होता, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला होता. याबाबत, मंत्री अस्लम शेख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मंत्री पदावर असल्याने अनेक कार्यक्रमांना आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी निमंत्रण असतं. तसेच, विविध पार्ट्यांसाठीही आमंत्रित केलं जातं, त्यातूनच काशिफ खानकडून मला क्रुझ पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, मी काशिफ खानला व्यक्तीगतरित्या ओळखत नाही, तसेच माझ्याकडे त्याचा संपर्क क्रमांकही नाही. जर कोणाकडे यासंदर्भातील पुरावा असेल, तर तो पुराव सबंधित यंत्रणांकडे देऊ शकता, असे काँग्रेस नेते आणि अस्लम शेख यांनी क्रुझ ड्रग्ज पार्टीसंदर्भात स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.
ड्रग्जप्रकरणात शाहरुख खानलाही धमकी
आर्यन खानला क्रुझवर अपहरण करुन नेण्यात आले. आर्यनला त्याचा मित्र प्रतिक गाभा आणि आमिर फर्निचरवाला याने नेले होते. हा संपूर्ण खेळ मोहित कंबोजनं(Mohit Kamboj) रचला होता. मोहित कंबोजचा मेव्हणा ऋषभ सचदेव या प्रकरणात सहभागी होता. NCB नं ११ लोकांना ताब्यात घेतले परंतु त्यातल्या ३ जणांना सोडण्यात आले. समीर वानखेडे मोहित कंबोजचा जवळचा आहे. शाहरुख खानलाही धमकावलं जात आहे. जर तू काय बोलला तर मुलगा जेलमध्ये जाईल असा आरोप नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केला आहे.
मोहित भारतीय आणि समीर वानखेडे यांची भेट
६ ऑक्टोबरला माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ तारखेला ओशिवरा कब्रस्तानच्या बाहेर समीर वानखेडे आणि मोहित भारतीय एकमेकांना भेटले. या भेटीनंतर वानखेडे घाबरलेले होते. त्यांनी पोलीस ठाण्यात कुणीतरी पाठलाग करत असल्याची तक्रार केली. या दोघांचे नशीब चांगले आहे. त्या भेटीच्या ठिकाणी लागलेले सीसीटीव्ही बंद होते अन्यथा ते फुटेज मिळाले असते.समीर वानखेडे हे मोठ्या सेलिब्रेटींकडून वसुली करायचे. NCB च्या या चांडाळ चौकडीला तात्काळ काढलं पाहिजे अशी मागणी मलिकांनी केली.
सुनील पाटीलचा NCP शी संबंध नाही
माझ्या आयुष्यात मी सुनील पाटीलला कधी भेटलो नाही. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही. सुनील पाटीलचे अमित शाहसोबत फोटो आहेत. गुजरातच्या मंत्र्यांसोबत फोटो आहेत. आम्ही फोटोवर आरोप लावत नाही. सुनील पाटील हादेखील समीर वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचा खेळाडू आहे. मी ६ तारखेला पत्रकार परिषद घेतली त्यानंतर २ तासाने मला सुनील पाटीलचा फोन आला. मला आणखी काही माहिती द्यायची असल्याचं सांगितलं. तेव्हा मी त्याला मुंबईत यायला सांगितले परंतु तो आला नाही. त्याला पोलिसांसमोर येऊन सत्य सांगायला बोललो तेव्हा तो गुजरातमध्ये असल्याचं म्हणाला. अद्याप सुनील पाटील समोर आला नाही, असा खुलासाही मलिकांनी केला. मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांना सुनील पाटील कोण असा प्रश्न केला होता. त्यावर मलिकांनी स्पष्टीकरण दिले.