मुंबई- राजधानी मुंबईतील कोस्टल रोड म्हणजे किनार मार्गच्या भूमिपूजनावरुन श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली असून कोस्टल रोड लोकार्पणाच्या सोहळ्यातही याचे पडसाद पाहायला मिळाले. बाळराजे म्हणाले की, आम्ही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेत नाही, आम्ही जे करतो, त्याचंच श्रेय आम्ही घेतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या शुभारंभप्रसंगी आमदार आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. तसेच, या कोस्टल रोडसाठी आपण घेतलेल्या परिश्रमाची माहिती देत, मी श्रेयवादासाठी कधीच मुंबईचा विकास थांबवला नाही, असेही फडणवीसांनी म्हटले.
मुंबईतील बहुप्रतिक्षीत कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राइव्ह अशा एका मार्गिकेचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबईकरांना कोस्टल रोडच्या या मार्गिकेवरुन मंगळवारपासून प्रवास करता येणार आहे. पण सध्या आठवड्यातील पाच दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ही मार्गिका खुली असणार आहे. तर, शनिवार आणि रविवारी या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. वरळीपासून ते मरीन ड्राइव्हच्या दिशेनं जाणारी मार्गिका खुली करण्यात आली आहे. या मार्गिकेमुळे पाऊण तासाचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत करणं शक्य होणार आहे. दरम्यान, या लोकार्पण सोहळ्यात श्रेत्रयवादी लढाई उघड झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
काल मला सोशल मीडियावर असं पाहायला मिळालं की, उबाठाचे बाळराजे यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं. आमच्या कामाचं श्रेय हे घेत आहेत. पहिल्यांदा मी त्यांना सांगतो, आम्ही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेत नाही, आम्ही जे करतो, त्याचंच श्रेय आम्ही घेतो. कोस्टल रोडची संकल्पना फार वर्षापूर्वीची असून उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या दोन निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या, कोस्टल रोड कधी झालाच नाही. सन २००४ ते २०१४ मध्ये राज्यात आणि केंद्रात युपीएचं सरकार होतं. रिक्लेमेशन न करु देण्याबाबत केंद्र सरकार ठाम होतं, युपीएमधील शेवटचे मुख्यमंत्रीही दिल्लीला जायचे आणि हात हालवत यायच. कधीही त्याला परवानगी मिळाली नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली दरबारी आपण प्रयत्न केल्याचे फडणवीसांनी अनेक उदाहरणांसह सांगितलं.
मला भूमिपूजनालाही बोलावलं नाही
आमच्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे हेही लोकांना कळलं पाहिजे, हे सगळं करुन मी आणलं, पण ज्यावेळी याचं भूमिपूजन करायचं होतं, रातोरात भूमिपूजन ठरवलं. मी मुख्यमंत्री होतो, तरी मला भूमिपूजनलाही उद्धव ठाकरेंनी बोलवलं नाही, अशी खंत देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली. तसेच, श्रेयाकरिता आम्ही कधीच लढलो नाही, कारण मी मुख्यमंत्री होतो, मी भूमिपूजन रोखू शकलो असतो, आयुक्तांना ते सांगूही शकलो असतो. पण, आम्हाला मुंबईचा विकास हवाय, आमच्यापेक्षा मुंबई मोठी आहे, आमच्या श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एखादा देवेंद्र फडणवीस राहिल, जाईल. पण, मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण करु शकलोय, त्यामुळे मुंबईकर जन्मभर आपलं नाव घेणार आहेत. त्यामुळे, कोत्या मनाची लोकं काय असतात, आणि मोठ्या मनाची लोकं काय असतात हे निश्चितपणे आपल्याला यातून लक्षात येईल, असेही फडणवीसांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांनीही साधला निशाणा
कद्रू लोकं श्रेय देऊ शकत नाहीत, कोत्या मनोवृत्तीच्या लोकांचं ते काम नाही. ते फक्त अडथळे आणतात, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. तसेच, अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी मच्छिमारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मी आयुक्त चहल यांना सांगितलं, मच्छिमारांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, असेही शिंदेंनी म्हटले.
१४ हजार कोटींचा खर्च
‘कोस्टल’मुळे पाऊण तासाचा प्रवास १० ते १५ मिनिटांत होणार असल्याने लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलं आहे. तसंच संपूर्ण रस्ता टोलमुक्त असणार असल्याची घोषणा याआधीच करण्यात आली होती.
ही आहेत वैशिष्ट्ये - कोस्टल रोडचा दक्षिणेकडील भाग प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असेल.
१) पुलांची एकूण लांबी- २.१९ कि.मी. २) रस्त्याची लांबी - १०.५८ कि.मी. ३) एकुण मार्गिका संख्या- ८४) दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका- (४-४)५) भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी - ४.३५ कि.मी.