Join us

Maharashtra Government: मी बंड केलं नव्हतं, अजितदादांनी मांडली 'भूमिका'; योग्य वेळी सगळं सांगणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 3:29 PM

'मी आज शपथ घेणार नाही'

मुंबई : मी बंड केलेलं नाही, मी भूमिका घेतली, मला जे काही बोलायचे आहे, ते योग्य वेळ आल्यावर बोलेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. 

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मी भाजपासोबत का गेलो होतो, त्याबद्दल मी योग्य वेळ आल्यावर बोलेन. आज मी त्याबद्दल काही बोलणार नाही, असे अजित पवार म्हणाले. तसेच, भाजपासोबत का गेलो? हे मला खोदून खोदून विचारु नका असे म्हणत मी योग्य वेळ आल्यावर बोलेन हे यापूर्वीच सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले.

याचबरोबर, मी आज शपथ घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतील. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ शपथ घेतील. मुख्यमंत्री आणि 6 जण शपथ घेणार आहेत. काँग्रेसकडून कोण शपथ घेणार माहीत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. या शपथविधीला मी आणि सुप्रिया सुळे जाणार आहोत, असे अजित पवार म्हणाले. याशिवाय, मी अजिबात नाराज नाही, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार, शरद पवारच आमचे नेते आहेत, असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.   

दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे सरकार स्थापन करणार आहेत. या 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सहा वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसुप्रिया सुळे