ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शित होऊ देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लष्कराला 5 कोटींची मदत देण्याच्या अटीवर जोरदार टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी निर्माते आणि राज ठाकरे यांच्यात मध्यस्थी केल्यामुळे त्यांच्याकडे वारंवार स्पष्टीकरण मागितल जात आहे. मात्र आपला ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाला विरोध होता असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मदत ऐच्छिक असावी तडजोडीसाठी नव्हे असंच माझं मत होतं. त्याबद्दलचं माझं मत मी राज ठाकरे यांच्यासमोरच व्यक्त केलं होतं. पण चित्रपट निर्मात्यांनी 5 कोटींची मदत देण्यास उत्सुक असल्याचं सांगितल्यानेच अखेर हा तोडगा काढला. शिवाय या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी विनंती केल्यानेच मी या वादात मध्यस्थी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना मनसेने विरोध केला होता. पाकिस्तानी कलाकार असलेला एकही चित्रपट रिलीज होऊ न देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळेच फवाद खान असलेल्या दिग्दर्शक करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाला मनसेने विरोध करत रिलीज होऊ न देण्याची धमकीच दिली होती.
पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या वादावर तोडगा काढण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी मांडवली केल्याची टीका करण्यात येत होती. तसंच त्यांच्याकडून यासंबंधी स्पष्टीकरणही मागितलं जात होतं. त्याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.