मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सांभाळत असलेल्या अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून घरी परतलेले अशोक चव्हाण यांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. याचदरम्यान 'बीबीसी मराठी' या न्यूज वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत अशोक चव्हाण आपले अनुभव सांगितले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी एक म्हण आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर माझी देखील तशीच अवस्था झाली होती. मनात खूप भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच रुग्णालयातील सुरुवातीचे दोन- तीन दिवस चिंतेत गेले. पण योग्य उपचार मिळाल्याने लवकर बरा झालो असं अशोक चव्हाण यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले.
अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मला असंख्य चाहत्यांचे फोन आले. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोन होता. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन माझी विचारपूस केली आणि लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छाही त्यांनी मला दिल्या असं अशोक चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण मुंबईला आले होते. या निवडणुकीनंतर ते पुन्हा नांदेडला परतले. नांदेडला येऊन त्यांनी स्वत: होम क्वारंटाइन करून घेतलं होतं. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळं ठेवलं होतं. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ते उपचारासाठी आज नांदेडहून मुंबईकडे रवाना झाले होते.