भाडे वसूल करणाऱ्या महिलेची माहिती : अद्याप गुन्हा दाखल नाही, छत कोसळून झाला होता मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगावमधील एमएमआरडीए इमारतीतील घराचे प्लास्टर कोसळून शुक्रवारी पहाटे आरसलान अन्सारी (८) या मुलाचा मृत्यू झाला होता. ज्या घरात ही दुर्घटना घडली त्या घराचे भाडे वसूल करणाऱ्या महिलेच्या नावावर ते घरच नसल्याचे तिने मृताच्या नातेवाइकांना सांगितले आहे. या महिलेने खोलीच्या दुरुस्तीबाबत तक्रार केल्याचा तिचा दावा असून, गोरेगाव पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.
आरसलान याचे मामा आमीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत झालेला त्यांचा भाचा गेल्या सहा महिन्यांपासून या खोलीत पालकांसोबत राहत होता. हे घर त्यांनी ज्या महिलेकडून भाडेतत्त्वावर घेतले होते तिला वारंवार घराच्या दुरुस्तीबाबत आरसलान याची आई फहमीदा यांनी सांगितले होते, मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. आरसलानच्या मृत्यूनंतर मात्र ती महिला हे घर मी तिसऱ्याच व्यक्तीकडून विकत घेतले असून ते अजूनही माझ्या नावावर नाही असे सांगत आहे. खोली दुरुस्तीबाबत मी संबंधितांना सांगितले होते. मात्र ती तक्रार लिखित नसून तोंडी असल्याने त्याचा काही पुरावा नसल्याचे तिचे म्हणणे आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश गोस्वामी यांची भेट घेतली असता याप्रकरणी चौकशी सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे शेख यांनी सांगितले.