'मी उंदीर मारण्याचे औषध प्यायलोय', मृत्यूपूर्वी पालिका कर्मचारी परमार यांचा बहिणीला फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:27 AM2021-12-30T06:27:28+5:302021-12-30T06:27:44+5:30
नालासोपारा येथे राहणाऱ्या शीतल मकवाना परमार ही मोठी बहीण आहे. त्यांनी गोरेगाव पोलिसांना २५ डिसेंबर रोजी एक अर्ज दिला आहे. त्या अर्जाची प्रत ‘लोकमत’कडे असून त्यात भावाने विष प्राशन केले तेव्हा मला फोन केला होता.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : मी उंदीर मारण्याचे औषध घेतले आहे, पी/दक्षिण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतोय, असा फोन सफाई कर्मचारी रमेश परमार यांनी मृत्यूपूर्वी बहिणीला केल्याचा तिचा दावा आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज तिने गोरेगाव पोलिसांना शनिवारी दिला असून, अद्याप पोलिसांकडून काही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
नालासोपारा येथे राहणाऱ्या शीतल मकवाना परमार ही मोठी बहीण आहे. त्यांनी गोरेगाव पोलिसांना २५ डिसेंबर रोजी एक अर्ज दिला आहे. त्या अर्जाची प्रत ‘लोकमत’कडे असून त्यात भावाने विष प्राशन केले तेव्हा मला फोन केला होता. अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मी विष प्राशन केल्याचे त्यांनी बहिणीला सांगितले. हीच बाब त्यांनी अर्जात नमूद करीत भावाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. मात्र, अद्यापही याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
माझ्या पुतण्याला ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केल्यावर रुग्णालय प्रशासनाने गोरेगाव पोलिसांना कळविले. तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा जबाब दोन वेळा नोंदविला. अंत्यसंस्कारांनंतर मी गोरेगाव पोलिसांना भेटलो तेव्हा त्यांनी अर्ज देण्यास सांगितले. अर्ज देऊन चार दिवस झाले आहेत. मात्र, गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
- पितांबर परमार,
मयत रमेश परमार यांचे काका
परमारप्रकरणात अद्याप कोणीही तक्रार केली नसल्याची माहिती मला मिळाली आहे. तरी मी याप्रकरणी चौकशी करतो.
- प्रवीण पडवळ - अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग