मॉडेलची मालवणी पोलिसांत तक्रार; तिघांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने पॉर्न फिल्म शूट रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर मालाडच्या मढ येथील बंगल्यात हॉटहीट मूव्हीज नामक पेड ॲपमध्ये न्यूड फोटो शूट करण्यासाठी धमकविण्यात आल्याचा आरोप एका २९ वर्षांच्या मॉडेलने गुरुवारी केला. याप्रकरणी तिने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॉडेलने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २९ डिसेंबर, २०२० रोजी तिच्या एका मित्राकडून तिला फोन आला. तिची एका चित्रपटासाठी निवड झाली असून, लोणावळ्यात त्याचे शूटिंग होणार असून, दरदिवशी २५ ते ३० हजार रुपये मानधन दिले जाईल, असे त्याने सांगितल्याने तिने प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर आलिशानामक महिलेने तिच्याशी संपर्क साधून मालाडच्या भूमी मार्टजवळ भेटायला बाेलावले. त्यानंतर आलिशा त्या माॅडेलला स्वतःच्या घरी घेऊन गेली. हॉटहीट मूव्हीज या पेड ॲप्लिकेशनसाठी काम असून, सहकलाकार अन्य शूटमध्ये व्यस्त असल्याचे कारण देऊन त्या रात्री आलिशाने तिला स्वतःच्या घरी थांबवून घेतले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबरला लोणावळ्याचे शूटिंग आता मढमध्ये होणार असल्याचे सांगत करार केला. इंग्रजीतील करार आलिशाच्या पतीने हिंदीत समजावला. नोकर सूरज शर्मा, कॅमेरामन मोनू यांच्यासह ती ग्रीन पार्क नावाच्या बंगल्यात पोहोचली. जिथे सपना शर्मा व रॉकी सिंग हे आधीच हजर होते.
सपनासोबत काही सीन शूट झाल्यानंतर आलिशाने मॉडेलला रॉकी व सपनासोबत न्यूड सीन करायला सांगितले. ज्याला मॉडेलने नकार दिल्याने करारानुसार तिला १० लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून भरावी लागेल, असे आलिशाने तिला धमकावले. अखेर शूट संपवून मॉडेल कोपरखैरणे येथील घरी निघून गेली आणि आलिशाने तिच्या मित्राच्या बँक खात्यात ३० हजार रुपये जमा केले. त्यानंतर तिच्या मित्राने तिला एक लिंक शेअर केली ज्यात तिचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता, जो व्हायरल झाल्याचेही तिला समजले. तिला शूटदरम्यान गुंगीचे औषध मिसळलेले पेय देण्यात आल्याचाही आरोप मॉडेलने केला आहे. त्यानुसार आलिशा ऊर्फ यास्मिन खानसह एकूण तिघांवर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
..........................