मी पंतप्रधान मोदींच्याही पाया पडेल, व्हायरल फोटोबाबत अमोल मिटकरींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 01:21 PM2022-07-17T13:21:53+5:302022-07-17T13:36:49+5:30

गेल्या काही दिवासांपासून अमोल मिटकरी सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार, भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहेत.

I will also fall at the feet of Prime Minister Modi, Amol Mitkari's explanation regarding the viral photo | मी पंतप्रधान मोदींच्याही पाया पडेल, व्हायरल फोटोबाबत अमोल मिटकरींचा खुलासा

मी पंतप्रधान मोदींच्याही पाया पडेल, व्हायरल फोटोबाबत अमोल मिटकरींचा खुलासा

Next

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यापासून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. तर, काही स्थगित केलेले निर्णय पुन्हा कार्यान्वित करताना पाहायला मिळत आहे. यावरून महाविकास आघाडीकडून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी हेही शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टिका करतात. त्यामुळे, आता एकनाथ शिंदेंच्या पाया पडतानाचा मिटकरी यांचा एक फोटो व्हायरल झाला असून याबाबत मिटकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे.  

गेल्या काही दिवासांपासून अमोल मिटकरी सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार, भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहेत. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो, कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ‘पीए’ म्हणून ठेवले, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लगावला. तर, शिंदे सरकारच्या निर्णयावरही ते टिका करतात. त्यावरुन, त्यांना ट्रोलही करण्यात येते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात अमोल मिटकरी यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाया पडताना दिसून येतात. या फोटोवरुन त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. त्याबाबत आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मी वारकरी संप्रदायचा असून मला वारकऱ्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे, मी तेव्हा एकनाथ शिंदे हे नगरविकासमंत्री असताना त्यांच्या पाया पडलो होतो. तो व्हिडिओ 23 मार्च 2022 रोजीचा असून तो आत्ताच भाजपच्या सोशल मीडियाकडून व्हायरल केला जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे ज्येष्ठ आहेत. मी वडिलकीच्या नात्याने त्यांच्या पाया पडलो, यापुढेही ते आमच्यासाठी वंदनीयच असतील. उद्या मला नरेंद्र मोदी भेटले तर मी त्यांच्याही पाया पडेल. कारण, तेही शरद पवारांच्या पाया पडतात, असे म्हणत आपण ज्येष्ठ म्हणून एकनाथ शिंदेंच्या पाया पडल्याचे आणि आपले ते संस्कार असल्याचेही मिटकरींनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टिका

ठाकरे सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः माइक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायचे, पण आताचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माइक खेचायला लागले आहेत. पुढे काय काय खेचतील सांगता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ‘पीए’ म्हणून ठेवले, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

राज्याला कृषीमंत्री नाही हे दुर्दैव 

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल. त्यानंतर हे सरकारच टिकणार नाही, असा दावा करत जिल्ह्यांत संततधार पाऊस झाला. जिल्ह्याला पालकमंत्री नाही. राज्याला कृषीमंत्री नाही, मग हे सरकार झोपा काढण्यासाठी आले आहे का, या सरकारला थोडीशी लाज लज्जा शरम असेल, तर गावात येऊन पाहावे. अजूनही या राज्याला कृषीमंत्री नसेल, तर या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली. 
 

Read in English

Web Title: I will also fall at the feet of Prime Minister Modi, Amol Mitkari's explanation regarding the viral photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.