Join us

फोन केलात तरी शंभर वेळा चौकशीला येईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:35 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : ईडीची काडी कोणी व कशासाठी केली? हे नागरिकांना कळून चुकलेले आहे. स्वतः मुख्यमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : ईडीची काडी कोणी व कशासाठी केली? हे नागरिकांना कळून चुकलेले आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात परखड भूमिका मांडली आहे. मी असल्या चौकशांना घाबरून महाराष्ट्र हिताची जबाबदारी बाजूला ठेवणार नाही. मी लढणारा आहे आणि लढत राहणार. स्वतः ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, नुसता फोन केलात तरी शंभर वेळा हजर होईन. पण मुलांचा काही संबंध नसताना त्यांना कशाला बोलावता? असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

ईडीची धाड आणि चौकशीनंतर पहिल्यांदाच सरनाईक हे मीरा-भाईंदर महापालिकेत आले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अभिनेत्री कंगना रनौत हिने पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड मिळाल्याच्या केलेल्या ट्विटबद्दल बोलताना ते म्हणाले, कंगनांना कुठून स्वप्न दिसले माहीत नाही. ज्या देशाचे क्रेडिटच नाही त्याचे क्रेडिट कार्ड ठेवून काय करणार? असा टोला त्यांनी लगावला. कंगना आणि तिच्या ट्विटच्या आधारे खोट्या बदनामीकारक बातम्या देणाऱ्यांवरही हक्कभंगासह कायदेशीर कार्यवाही करणार? असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

टॉप्स प्रकरणी दाखल दोन्ही गुन्ह्यांत आपले कुठेही नाव नसताना व कोणता पुरावा नसताना केवळ तोंडी कोणीतरी बोलले या आधारावर चौकशी केली जात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ईडीला त्यांच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करीत आहोत आणि भविष्यातही करणार. कंगना आणि अर्णब गोस्वामीवर हक्कभंग टाकल्यानंतर माझ्यामागे ईडीची चौकशी लावली. पण, आपण घाबरणार नाही. शूरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दलही जाणीवपूर्वक अपूर्ण प्रतिक्रिया दाखवत दिशाभूल करून वाद निर्माण करण्याचे कारस्थान आहे. तानाजी मालुसरे स्वराज्य आणि राजांसाठी जीवाची बाजी लावून लढणारे शूर योद्धा होते व माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या मार्गावरच चालण्याचा प्रयत्न असतो, असे ते म्हणाले.

मुलांना कशाला बोलावता?

आपण ईडी अधिकाऱ्यांना सांगितले की, मुलांना कशाला बोलावता? त्यांचा काय संबंध? मुले अजून लहान असून आता कुठे त्यांचे करिअर सुरू झाले आहे. उलट मला नोटीसही पाठवू नका, नुसता फोन केला तरी मी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होईन, असे अधिकाऱ्यांना सांगितल्याचे सरनाईक म्हणाले.