CoronaVirus: माझ्या बायको-मुलील क्वारंटाईन केलं तर आत्महत्या करेन म्हणाला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 05:44 PM2020-04-23T17:44:14+5:302020-04-23T17:44:41+5:30

कोरोनाग्रस्त रुग्णाची धमकी आणि कुटुंबाचा थयथयाट : तपासणीत पत्नी आणि मुलीचे रिपोर्टही पाँझिटीव्ह   

I will commit suicide if I quarantine my family | CoronaVirus: माझ्या बायको-मुलील क्वारंटाईन केलं तर आत्महत्या करेन म्हणाला, अन्...

CoronaVirus: माझ्या बायको-मुलील क्वारंटाईन केलं तर आत्महत्या करेन म्हणाला, अन्...

Next

मुंबई - मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. पण, पत्नी आणि मुलीला क्वारंटाईन करायचे नाही. तसे केले तर मी आत्महत्या करीन अशी धमकी रुग्ण देत होता. तर, तुमच्या सेंटरपेक्षा चार बेडरुमच्या घरातच आम्ही सुरक्षित आहोत असे सांगणारी पत्नी शेलक्या शब्दात आमचा ‘उध्दार’ करत होती. या नाट्यमय घटनाक्रमानंतरही  आम्ही जबरदस्तीने त्या दोघींची चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यांची बोबडी वळली आहे... ठाण्यातील उच्चभ्रूंच्या सोसायटीतला हा धक्कादायक प्रकार सांगताना पालिकेचे अधिकारी भलतेच कातावले होते.   

मुंबईतील एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या आणि ठाण्यात वास्तव्याला असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हाय रिस्कमध्ये असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यासाठी पालिकेची पथके धडकली. हे वृत्त त्या व्यक्तीला कळताच तो थेट आत्महत्येची धमकी देऊ लागला. त्याची पत्नी घरी गेलेल्या अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेतच बोलत होती. माझ्या घरी ‘प्रेशियस टॉर्टाईज’ आहेत. त्यांना सोडून मला कुठेही जाता येणार नाही. तुम्ही चालते व्हा. अँम्ब्यूलन्स आणून तुम्ही आमची  सोसायटीतली ‘इज्जत’ घालवली आहे असा शा‍ब्दिक हल्लाच त्या महिलेने चढवला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची वेळ पालिकेवर आली. त्यानंतरही प्रोटोकाँलनुसार या मायलेकींची तपासणी करून त्यांना जबरदस्तीने क्वारंटाईन सेंटरमध्ये धाडण्यात आले. आता त्या दोघींचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. चार दिवसांपूर्वीचा तमाशा बघून आम्ही यांना सोडले असते तर आज काय झाले असते असा सवाल या सर्व घटनाक्रमात मनस्ताप सोसणाऱ्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतना व्यक्त केला आहे.    

सोसायट्यांमध्ये मनमानी  

पालिकेचे अधिकारी आणि कर्मचा-यांना तपासणीसाठी सोसायटीच्या आवारात प्रवेश द्यायचा नाही असा ठराव घोडबंदर रोडवरील एका सोसायटीने केला होता. या ठराव करण्यासाठी सोसायटीचे सात सदस्य एकत्र आले होते. त्यांच्यावरच गुन्हे दाखल करतो असा इशारा दिल्यानंतर ते सुतासारखे सरळ झाले आहेत. घरा - घरांमध्ये चौकशीसाठी गेल्यानंतर भिकाऱ्यांना जसे हुसकवले जाते तशा पद्धतिने कर्मचा-यांच्या तोंडावर दारवाजे बंद केले जातात. असे अनुभव रोजचेच झाले असून अशा श्रीमंतांपेक्षा गरीब आणि मध्यमवर्गीय समजात जास्त समंजस दिसतोय अशी संतप्त प्रतिक्रिया अधिका-यांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: I will commit suicide if I quarantine my family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.