मुंबई : ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हे विधान मी केलेले नव्हते, पण त्यावरून इतक्या नकारात्मक प्रतिक्रिया का आल्या, याचे मला आश्चर्य वाटते, पण असे विधान केले, तरी यात महाराष्ट्रावर किंवा काही लोकांवर एवढे आकाश कोसळण्यासारखे काय होते? एखाद्या महिलेच्या बाबतीत महाराष्ट्र असा असहिष्णू कसा होऊ शकतो? याचे मला प्रचंड आश्चर्य वाटले होते, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आपली खंत बोलून दाखविली. त्याच वेळी जनतेकडून मात्र याबाबत कोणतीच नकारात्मक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याचा खुलासाही मुंडे यांनी आवर्जून केला.
विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘लोकमत टाॅक’ या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. ‘लोकमत टाॅक’ या उपक्रमाचे पहिले पुष्ष पंकजा मुंडे यांची प्रकट मुलाखत आणि गप्पांनी गुंफण्यात आले. न्यूज 18 लोकमत या कार्यक्रमाचे सहभागीदार आहेत. मुंडे यांची मुलाखत ‘मुंबई लोकमत’चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी घेतली.
‘न्यूज 18 लोकमत’वर आज प्रक्षेपण
‘लोकमत टाॅक’उपक्रमांतर्गत पंकजा मुंडे यांची ही मुलाखत रविवारी ‘न्यूज 18 लोकमत’ या वृत्तवाहिनीवर दुपारी १२:३० वाजता आणि सायंकाळी ५:३० वाजता पुन:प्रक्षेपित केली जाणार आहे.
धनंजयबद्दल म्हणाल्या...
पंकजा निवडणूक लढविणार, हा निर्णय गोपीनाथ मुंडे यांनी घेतला होता. त्यांनी तो का घेतला, ते आज महाराष्ट्राला कळले असेल. मी आजवर या संदर्भात कधी बोलले नाही. धनंजयबाबत काही कारणे काळजीची होती. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांनी तो निर्णय घेतला. त्याचवेळी धनंजयना विधान परिषदेवर घेऊन हा विषयही बरोबरीत सोडवला होता. पण, त्यानंतरच्या संघर्षाचे उत्तर तर धनंजयलाच माहीत, असे उत्तर दोन्ही भावा-बहिणीमधील संघर्षाबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी दिले.