'सरकारी यंत्रणांना मी सहकार्य करणार, उत्तर सगळ्यांनाच द्यावी लागणार'; किशोरी पेडणेकरांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 12:01 PM2023-11-08T12:01:55+5:302023-11-08T12:03:35+5:30
ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
मुंबई- ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पेडणकर यांना ईडीचे समन्स आले आहे. आज त्यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे, याअगोदर त्यांमी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटाला टोला लगावला आहे.
“कोणी भेटायला आले किंवा नाही तरी आमचे काम सुरु, परंतु २४ डिसेंबरनंतर...”: मनोज जरांगे
माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, सरकारी यंत्रणा आहेत, त्या यंत्रणेचा मला समन्स आला आहे. त्या यंत्रणांना मी सहकार्य करणार. आता त्या सरकारी यंत्रणांमध्ये राजकारण आले आहे, असा टोलाही पेडणेकर यांनी लगावला आहे. 'मी मुंबईत माझ्या अडीच वर्षाच्या कालावधीत काम केलं आहे. हे जगाने पाहिले आहे. उत्तर सगळ्यांनाच द्यावे लागणार आहे. आरोप कोण करत आहे त्यांचा इतिहास, भूगोल काय आहे हे जगाला माहित आहे, अशी टीकाही शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. 'मी कोणतही चुकीचं काम केलं नाही, फक्त आरोप करुन दबाव आणायचा नाही, असंही पेडणेकर म्हणाल्या.
कोरोना काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी प्रकरणी ईडीने पेडणेकर यांना समन्स बजावला आहे. किशोरी पेडणेकर यांना आज बुधवारी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे.
किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने बजावले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर यांची सप्टेंबर महिन्यात २ तास चौकशी केली होती. या कथित फसवणुकीची रक्कम ४९.६३ लाख इतकी असून याप्रकरणी ईडी आणखी काही जणांना चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.
कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांना नेण्यासाठी महापालिकेने बॉडी बॅग्सची खरेदी केली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी किशोरी पेडणेकर व महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटकेची शक्यता वर्तविण्यात होती मात्र, किशोरी पेडणेकर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. ४ सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्यांना चार आठवड्यासाठी अटकेपासून संरक्षण दिले होते.