उद्या मुंबई महापालिकेतील 100 कोटींचा घोटाळा उघड करणार; किरीट सोमय्या यांची मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 03:29 PM2021-12-13T15:29:47+5:302021-12-13T15:30:07+5:30
'येत्या काही दिवसांत महापालिकांमधील अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांमधील पार्टनरशिपचे आणखी पाच घोटाळे उघडे करणार.'
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी एक मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहे. कोरोना काळात शिवसेनेने भ्रष्टाचाराचा जागतिक विक्रम केला, मंगळवारी मुंबई महापालिकेतील 100 कोटींचा घोटाळा उघड करणार, असा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेनेने भ्रष्टाचाराचा रेकॉर्ड केला
काल डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर किरीट सोमय्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. कोरोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केला आहे. अनेक मंत्र्यांचा घोटाळा मी उघडकीस आणला, आता या मंत्र्यांच्या परिचित व्यक्ती आणि एक अधिकाऱ्याचा घोटाला समोर आणणार, असं सोमय्या म्हणाले.
येत्या काही दिवसात अनेक घोटाळे समोर आणणार
ते पुढे म्हणाले की, मंत्र्यांच्या परिचित व्यक्ती आणि अधिकाऱ्याच्या कंपनीला मुंबई महापालिकेत कोरोना काळात कशा पद्धतीने 100 कोटीचे कंत्राट मिळाले, हे येत्या मंगळवारी जनतेसमोर ठेवणार आहे. त्यानंतर पुढच्या महिनाभरात एमएमआर रिजनमधील महापालिकांमधील अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांमधील पार्टनरशिपचे आणखी पाच घोटाळे उघडे करणार, असंही ते म्हणाले.
वानखेडेंच्या जन्मदाखल्याचे पुरावे महापालिकेकडे नाही
यावेळी सोमय्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या प्रकरणावरही भाष्य केले. नवाब मलिकांनी शेअर केलेल्या समीर वानखेडेंच्या जन्मदाखल्याचे कोणतेही पुरावे मुंबई महापालिकेकडे नाही, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी महितीच्या अधिकारात दिली आहे. मलिकांना कुठून तरी झेरॉक्स मिळाली, ती त्यांनी दाखवली. आता समीर वानखेडेचे जन्मदाखल्याचे गूढ रहस्य मुंबईच्या महापौर, नवाब मलिक आणि मुंबई महापालिका आयुक्तांनी जनतेसमोर ठेवावे, असंही सोमय्या म्हणाले.