येत्या गणेशोत्सवासाठी मंडळांच्या विचारांना प्राधान्य देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:06 AM2021-05-17T04:06:33+5:302021-05-17T04:06:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा अधिक हाहाकार माजला आहे. हेच लक्षात घेता शासनाच्या वतीने लॉकडाऊनची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा अधिक हाहाकार माजला आहे. हेच लक्षात घेता शासनाच्या वतीने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे मोठे समारंभ, सण-उत्सव यांवर पुन्हा निर्बंध आले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवाचे यंदाचे स्वरूप कसे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विचारांना प्राधान्य देऊनच यंदाच्या गणेशोत्सवाची दिशा ठरवणार असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामुळे शासनाच्या निर्णयाकडे सर्व गणेशोत्सव मंडळांचे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सण व उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून साजरा करण्यात आला. अनेक मंडळांनी रक्तदान शिबिर, प्लाझ्मादान शिबिर, आरोग्य तपासणी व औषध वाटप अशा उपक्रमांचे आयोजन केले होते; तर काही मंडळांनी गर्दी टाळण्यासाठी गणेशमूर्तींची उंची छोटी ठेवली होती. तसेच आगमन व विसर्जन सोहळेदेखील रद्द करण्यात आले होते. यंदाच्या वर्षीदेखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत आता कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरीदेखील तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचे स्वरूप कसे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गिरीश वालावलकर (सचिव, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती) - आत्ताच्या संकटजन्य परिस्थितीत गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते हे ठिकठिकाणी कोरोना वॉरियर्स म्हणून काम करीत आहेत. गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी समिती नेहमी प्रयत्नशील असते. गणेशोत्सवासंबंधी उपाययोजनांसाठी निर्णय घेण्यासाठी शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता गणेशोत्सव मंडळांचा नक्की काय विचार आहे, त्या विचारांना प्राधान्य देऊनच यंदाच्या गणेशोत्सवाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.