‘खाऊपिऊ देईल, तो सांगेल ते बटण दाबायचं!’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 02:03 AM2019-04-04T02:03:04+5:302019-04-04T02:03:32+5:30

३३ मिनिटांचा प्रवास । लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करताना ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’, भांडुप ते करी रोड 19 किमी

'I will give you food, tell him to press the button!' | ‘खाऊपिऊ देईल, तो सांगेल ते बटण दाबायचं!’

‘खाऊपिऊ देईल, तो सांगेल ते बटण दाबायचं!’

Next

मनीषा मिठबावकर 

मुंबई : दुपारी सव्वातीनची वेळ. अंबरनाथहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धिमी लोकल. महिलांचा शेवटचा डबा. लांबलचक सीटवर चार महाविद्यालयीन तरुणी गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांच्याच समोर एक महिला पुस्तक वाचत होती. तिच्या शेजारी एक महिला डोळे बंद करून बसली होती, तर आणखी एक शेंगदाणे खात होती. कांजूर स्थानकावर गाडी थांबली. नववारी साडीतील साठीच्या वयाची, डोक्यावर रिकामी टोपली, हातात भाजीची मोठी पिशवी घेतलेली आजी गाडीत चढली. ती त्या मोठ्या सीटवर येऊन बसली.

‘तुमच्यासाठी मालडबा आहे ना, तिथे जायचे,’ नाराजीच्या स्वरात तेथे बसलेली एक महिला म्हणाली. ‘बाई, गाडी रिकामी व्हती, म्हणून चढले,’ आजी म्हणाली. तिच्या पिशवीतून डोकावणाऱ्या फ्लॉवर, कोबीकडे पाहून ‘भाजी विकता वाटतं?’ असं शेंगदाणे खाणाऱ्या महिलेने विचारले.
‘व्हय बाय, पण आठ दिस आजारी व्हते. माल विकायला गेली नाय, तर माजी जागा दुसºयाने बळकावली,’ तिच्या आवाजात आणि चेहºयावरही प्रचंड काळजी दिसत होती.
‘असं कसं, तुम्ही फेरीवाला धोरणांतर्गत अर्ज भरला नाही का?’ समोरच्या सीटवरील महिलेने विचारले.
‘अवं ताई, एका सायबानं दोनदा कागुद भरून घेतला. त्यावर माझा फोटो बी डकवला. अंगुठा घेतला. आता लवकरच या जागेवरून तुम्हाला कुणीबी उठवणार नाय, असं सांगत शे, दोनशे रुपये घेतले, पण काय बी झालं नाय, आपलं तकदीर दुसरं काय,’ आजी हताश होऊन म्हणाली.
‘हे असंच असतं. सर्वसामान्यांना लुबाडतात. निवडणुका आल्या की, गोड बोलून फसवतात. म्हणूनच मी ठरवलंय यंदा ‘नोटा’चा वापर करायचा,’ शेंगदाणे खाणारी महिला म्हणाली.
‘मॅडम, मत वाया कशाला घालवायचं? योग्य उमेदवार निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे,’ तेथे बसलेल्या महाविद्यालयीन मुलींपैकी एक आवेशात म्हणाली.
‘अरे वा, कोण किसको चुनेगा बाबा,’ असं म्हणत टाळ्या वाजवत तेथे आलेल्या एका तृतीयपंथीयाने त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला. तितक्यात त्याचं लक्ष आजीकडे गेलं.
‘काय आई, बरी ना, खूप दिवसांनी दिसली,’ त्याने विचारलं.
‘बरीच हाय म्हणायचं. आपल्याला काय, कोणी बी निवडून यावं, मला भाजी विकायला माझी जागा दिली तरी लय झालं,’ आजी शेंगदाणे खाणाºया महिलेकडे बघून म्हणाली.
‘अरे वा इलेक्शन, सिलेक्शन...’ असं म्हणत त्या तृतीयपंथीयाने जोरजोरात टाळ्या वाजविल्या. ते पाहून महाविद्यालयीन तरुणी हसल्या.
‘अरे हसने को क्या हुआ, टेन्शन रे बाबा, रेल्वे मे पैसा माँगो, गुरू को हप्ता दो, कमाएगी क्या, खाएगी क्या? देख देख बात करते करते स्टेशन आया. मेरा एरिया इधर तक ही है, अभी उतरी नही और गुरू को पता चला तो... और पैसा देना पडेगा, नही रे बाबा... आई काळजी घे गं, चल बाय...’ असं म्हणत टाळ्या वाजवतच तृतीयपंथी ट्रेनमधून उतरला. गप्पा अजूनही सुरूच होत्या.
‘मी ठरवलंय पक्ष बघायचा नाही, ज्याने आपल्या वॉर्डसाठी काम केलंय, त्यालाच निवडून द्यायचं,’ महाविद्यालयीन मुलींपैकी एक म्हणाली. ‘यस यू आर राइट,’ दुसरीने तिच्या हातावर टाळी देत म्हटलं.
‘आजी तुम्ही कोणाला मत देणार?’ त्यांच्यापैकी एकीने विचारलं.
‘निवडणुका आल्या का, मला काय बी माहीत नाही. माझं काय, आमाला जो मत द्यायला गाडीतून नेईल, खाऊपिऊ देईल, तो सांगेल ते बटण दाबायचं...’ आजी म्हणाली.
‘आजी, जो आपल्यासाठी काम करेल, त्याचं चिन्ह लक्षात ठेवून त्यालाच मत द्यायचं,’ आतापर्यंत पुस्तकात डोकं खुपसून बसलेली महिला संभाषणात सहभागी झाली. गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या, तोपर्यंत ‘अगला स्टेशन परेल,’ अशी अनाउन्समेंट झाली आणि आजी आवराआवर करू लागली.
‘आजी समजलं ना, मत कोणाला द्यायचं ते,’ पुस्तक वाचणाºया महिलेने पुन्हा विचारले.
आजी हसली, ‘आधी आज भाजी विकायला जागा मिळू दे बाय,’ असं म्हणत स्टेशन येताच उतरली. पुढच्या स्टेशनला मलाही उतरायचे असल्याने मीदेखील दरवाजाजवळ गेले. मात्र, डोक्यात ट्रेनमधील संभाषणाचे चक्र फिरतच होते. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, जगण्यासाठीचा संघर्षही ठरलेलाच, पण हेच जगणे सुसह्य होण्यासाठी योग्य नेता निवडणे गरजेचे आहे, नाहीतर ट्रॅकवरून चाललेली जीवनाची गाडी रुळावरून घसरायला वेळ लागणार नाही, याची मलाही नव्याने जाणीव झाली.

पुस्तक सोडून तिनेही मांडले मत
च्निवडणुका आल्या का, मला काय बी माहीत नाही. माझं काय, आमाला जो मत द्यायला गाडीतून नेईल, खाऊपिऊ देईल, तो सांगेल ते बटण दाबायचं...’ आजी म्हणाली. ‘आजी, जो आपल्यासाठी काम करेल, त्याचं चिन्ह लक्षात ठेवून त्यालाच मत द्यायचं,’ आतापर्यंत पुस्तकात डोकं खुपसून बसलेली महिला संभाषणात सहभागी झाली. गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या.

Web Title: 'I will give you food, tell him to press the button!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Votingमतदान