मैं तुम्हें फिर मिलुंगा... शब्दों से... रंगों से...! कवी-चित्रकार इमरोज यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 06:37 AM2023-12-23T06:37:37+5:302023-12-23T06:37:56+5:30
इतर चित्रकारांप्रमाणे इमरोजही मूडी होते. कधी मुंबईत यायचे, तर कधी दिल्लीमध्ये राहायचे.
- इक्बाल चरण (सिने दिग्दर्शक )
इतर चित्रकारांप्रमाणे इमरोजही मूडी होते. कधी मुंबईत यायचे, तर कधी दिल्लीमध्ये राहायचे. अमृता यांची नातवंडेच त्यांची देखभाल करत. त्यांच्या दिल्लीतील घरातील ड्राॅइंग रूममध्ये फक्त आणि फक्त अमृताचीच चित्रे होती... अमृता गेल्यावर ते खूप एकटे पडले होते. त्यामुळे कायम तिच्याच आठवणीत रमायचे. तासनतास तिथेच बसून राहायचे. तिथेच त्यांना शांती मिळायची. अमृतासोबत ते राहत असलेले घरही त्यांनी अमृताची नज्मे, गझल आणि चित्रांनी रंगवले होते. पूर्वी दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या ‘शमा’ या फिल्मी वर्तमानपत्रामध्ये इमरोज गझलसोबत स्केच बनवण्याचे काम करायचे. तिथून दिल्लीत ते लोकप्रिय होत गेले. त्यांची कला पुस्तके आणि टायटल्सच्या पलीकडे जाऊ शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तिने शब्दांची आराधना केली. त्यांची पूजा मांडली. त्याने त्यावर रंगांची फुले उधळली. तिने सत्याला, स्वातंत्र्याला आपल्या लेखणीने उभारले. त्याने कुंचला सरसावून त्याची गुढी बांधली. तिने नश्वर देहाची वस्त्रे भिरकावून आपल्या स्वतंत्र जगण्याला मोकळे केले. त्याने देहावर कधी प्रेमच केले नव्हते, म्हणून तो आत्म्याच्या झुल्यावर झुलतच आहे.
ते होते इमरोज! त्या होत्या अमृता!
इमरोज आणि अमृता... दोघांना वेगवेगळे मांडता येणे कठीण. एकाचे नाव निघाले तर दुसऱ्याचे आपोआप येते. अलौकिक प्रतिभेचे धनी, कवी-चित्रकार इमरोज (वय ९७) यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. कांदिवली येथे अमृता प्रीतम यांच्या नातवंडांसोबत ते राहत होते.
अंधश्रद्धेत न अडकणारे इमराेज
अमृताजींनी इच्छा व्यक्त केली होती. माझ्या मृतदेहाबरोबर माझी लेखणी ही ठेवा. तुम्ही ती इच्छा पूर्ण केली का? असे विचारताच इमरोजजी हसून म्हणाले हाेते, “अहो तिची काय एक लेखणी होती का? शेकडो पेनांनी ती लिहीत होती. बरे तिला लिहिण्यासाठी पेनच हवा असेही नाही. स्कूटरवरून जाताना ती बोटानेच माझ्या पाठीवर साहिर-साहिर लिहित असे. तिच्या बोटांना ती सवयच होती.
कुठेही बसली तरी तर्जनीने ती ‘साहिर’ असे लिहित असे. कशाला ठेवायची लेखणी? बरे ती कशावर लिहायची, माझ्या पाठीवर, माझ्या. त्यामुळे असल्या अंधश्रद्धेत मी कधी अडकलाे नाही.
आणि तिथेच शेवटचा श्वास घेतला...
अमृताजींवर इमरोज यांचे प्रेमच होते, आहे. अंधश्रद्धा नव्हती. चाळीस वर्षांच्या सहवासानंतर अमृताजींनी देहाची वस्त्रे उतरवली. तेव्हा इमारोजजी रडले नाहीत. ‘मी खूप’ रिलॅक्स झालो’ असे ते म्हणाले हाेते. ‘तिला यातनांच्या बेड्यातून मी सोडवू शकलो नसतो. मृत्यूने ते काम केले. एक स्वातंत्र्याची आवड असणारा आत्मा देहाच्या पिंजर्याला सोडून पुन्हा स्वतंत्र झाला. असे म्हणणाऱ्या इमराेज यांनी शुक्रवारी अमृता प्रीतम यांच्या नातवंडांच्या घरी शेवटचा श्वास घेतला.
तेवढे वगळून वाचा!
उमा त्रिलोकने इमराेज अमृतावर पुस्तक लिहिले पण ते त्यांनाच दिले नव्हते. अरबिन्दो मार्केटमध्ये जाऊन पुस्तक आणले तेव्हा त्यात, त्या दोघांपेक्षा त्या बाई, त्यांच्या कविता, मुलगी जास्त डोकावते, असे विचारताच इमरोजजी क्षणात म्हणाले,“तेवढा भाग वगळून वाचा. मग त्रास होत नाही.”
बरे झाले, मी गेलो नाही!
अृमताजींना पहिल्या पतीपासून मूल होत नव्हतं. म्हणून त्यांनी एक मुलगी (कंदला) दत्तक घेतली. लवकरच अमृताजींना मुलगा (नवराज) झाला. मग त्यांनी प्रीतमसिंहजींबरोबर घटस्फोट घेतला. नवराज मोठा झाला. त्याच्या लग्नाची सर्व तयारी इमरोजजींनी केली हाेती. पण ऐन लग्नाच्या वेळी काही मंडळी त्यांना म्हणाली,‘तुम्ही तिथे येऊ नका’ इमरोजजी गेले नाही. बरे त्याचा त्यांना रागही आला नाही. उलट ते डोळे मिचकावून म्हणाले, “बरे झाले मी गेलो नाही. नाहीतर नव्या सुनेच्या स्वागतासाठी फुलांनी घर कुणी सजवलं असतं?”... हा माणूस आयुष्यभर फक्त प्रेमच करत राहिला.