Join us

मी ते कधीच विसरणार नाही, अन्...; मोहित कंबोज यांचा उद्धव ठाकरे-सुप्रिया सुळेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 1:56 PM

प्रत्येक अपमान लक्षात ठेवा, प्रत्येक अत्याचार लक्षात ठेवा या सर्वांचा हिशोब होणार आहे असं कंबोज यांनी ट्विट केले आहे.

मुंबई - मागील सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचा डाव आखला होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्याच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. उद्धव ठाकरे सूडाचं राजकारण करणार नाही असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्यासोबत जे काही केले ते मी कधी विसरणार नाही. सर्वांचा हिशोब होणार असा इशारा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना टॅग करून दिला आहे. 

मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, माझ्यावर जमावाने हल्ला करून माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला. मला अटक करण्यासाठी माझ्याविरोधात खोट्या आणि बनावट खटले दाखल केले. माझे घर आणि कार्यालय पाडण्यासाठी नोटीस पाठवल्या. ५७ नोटीस आणि रात्रदिवस माझ्या कुटुंबाला आणि मुलांना धमकावण्यात आले असा आरोप त्यांनी केला आहे. 

त्याचसोबत भाजपा महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवं, महाविकास आघाडी सरकार आणि त्यांच्या नेत्यांनी कशारितीने खोटे केस करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना चुकीची वागणूक दिली. प्रत्येक अपमान लक्षात ठेवा, प्रत्येक अत्याचार लक्षात ठेवा या सर्वांचा हिशोब होणार आहे. तसेच गिरीश महाजन, किरिट सोमय्या, प्रविण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, नारायण राणे, चित्रा वाघ, नवनीत राणा, रवी राणा आणि अनेक महाराष्ट्र भाजपा कार्यकर्ते ज्यांच्यावर मविआ काळात अन्याय झाला या सर्वांनी त्यांचा अपमान लक्षात ठेवायला हवा असं आवाहनही मोहित कंबोज यांनी केले आहे. 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?देवेंद्र फडणवीस यांचे विधान हास्यास्पद आहे. दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या विधानावर सविस्तर बोलले आहेत. देवेंद्रजी आपस ये उम्मीद न थी अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग, धायरीत गोळीबार झाला अशा घटना घडल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी यावर बोलणे अपेक्षित होते. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशी परिस्थिती त्यांनी यावर बोलावे, असं सांगत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली होती. 

टॅग्स :मोहित कंबोज भारतीयसुप्रिया सुळेउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस