मुंबई - काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. मात्र, माझ्या वडिलांबद्दल मी काही सांगू शकत नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी दिले आहे. काँग्रेसमध्ये नाराज असलेले झिशान आणि त्यांचे वडील माजी मंत्री बाबा सिद्दिकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) संपर्कात असून, लवकरच हे दोघे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याबाबत स्पष्टीकरण देताना झिशान यांनी हे विधान केले आहे.
बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले होते. या भेटीनंतर दोघेही अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा चालू झाली आहे. १० फेब्रुवारी रोजी दोघांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचेही सांगितले जात आहे. या चर्चेवर स्पष्टीकरण देताना झिशान म्हणाले की, मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही. मी काँग्रेसमध्येच आहे. मी आणि माझ्या वडिलांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीबाबतचे वृत्त खरे आहे. आमचे कौटुंबिक नाते आहे. त्यामुळे आम्ही अधूनमधून भेटत असतो. ती काही राजकीय बैठक नव्हती. मी इतर कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही.