Join us  

मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही, पण...; रामदास कदमांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 1:01 PM

शिवसेनेसाठी अख्खं आयुष्य घालवलं. ५२ वर्ष संघर्ष केले. पक्षाची वाईट वेळ असताना उद्धव ठाकरेंच्या गाडीत पुढच्या सीटवर मी स्वत: बसलो होतो. कडवट, निष्ठावंत असतानाही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो अशी खंत रामदास कदमांनी बोलून दाखवली.

मुंबई – मी शिवसेनेतून बाहेर पडणार नाही. माझी पक्षातून हकालपट्टी केली तरी शिवसैनिक म्हणून जगेन. शिवसेनेत अनिल परब सध्या पक्षप्रमुख म्हणून काम करतायेत. मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. परंतु माझ्या मुलांच्या आणि इतर समर्थकांच्या भवितव्यासाठी मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असा इशारा शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम यांनी दिला आहे.

रामदास कदम(Shiv Sena Ramdas Kadam) पत्रकार परिषदेत म्हणाले की, मी भाजपात जाणार असल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रात छापून आणायच्या आणि ते उद्धव ठाकरेंना दाखवायचं असा डाव अनिल परबांचा आहे. मला उद्धव ठाकरेंनी वेळ दिला तर त्यांच्यासमोर हे सगळं मांडेन. अनिल परब यांचे मत हे उद्धव ठाकरेंचे मत आहे का? हे स्पष्टीकरण मिळाल्यावरच पुढचा निर्णय घेऊ. अनिल परबासारखी माणसं शिवसेना संपवतायेत. भगवा झेंडा शिवसेनेचा आहे परंतु भाजपाचा नाही. अनिल परबांची भूमिका, उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल त्यावर पुढचा निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितले.

तसेच शिवसेनेसाठी अख्खं आयुष्य घालवलं. ५२ वर्ष संघर्ष केले. पक्षाची वाईट वेळ असताना उद्धव ठाकरेंच्या गाडीत पुढच्या सीटवर मी स्वत: बसलो होतो. कडवट, निष्ठावंत असतानाही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो असं सांगताना रामदास कदमांना अश्रू अनावर झाले. त्याचसोबत हे स्वत: शिवसेनाप्रमुख झालेत. मी फक्त एकदा उद्धव ठाकरेंना भेटलो. अडीच वर्षाआधीच मी निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली होती. तरीही माझ्याविरोधात बातम्या ऐकायला मिळाल्या. मी कधीही तिकीटाची मागणी केली नाही. मग माझ्यावर अन्याय का? असा सवालही रामदास कदमांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तिथे भेटण्यासाठी वेळ नसणारे अनिल परब ३ दिवस रत्नागिरीत ठाण मांडून बसलेत. रामदास कदम यांना संपवण्याचा घाट त्यांनी घातला आहे. उद्धव ठाकरे गैरहजर असल्याचा फायदा या लोकांनी घेतला असावा. मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, आजतागायत किरिट सोमय्यांना कधी भेटलो नाही, त्यांचा चेहराही पाहिला नाही. अनिल परब म्हणजेच पक्ष असेल आणि रामदास कदम यांचं शिवसेनेसाठी योगदान नसेल तर मी काही करुच शकत नाही असंही रामदास कदम यांनी म्हटलं.

रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

गेल्या ३-४ महिन्यापासून सातत्याने माध्यमांमध्ये रामदास कदमांविरोधात बातम्या

माझ्याविरोधात कटकारस्थान होत असून राजकीय आयुष्य संपवण्याचा डाव आहे.

शिवसेना पक्षाला हानी पोहचेल असं कुठलंही वक्तव्य मी केले नाही.

२ नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून कालपर्यंत काही पथ्य पाळली

उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सर्व काही सत्य परिस्थिती मांडली होती.

मागील २ वर्ष अनिल परब फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला रत्नागिरी जिल्ह्यात येतात

पालकमंत्री म्हणून अनिल परब यांनी जिल्ह्यात काहीच काम केले नाही

अनिल परबांच्या हॉटेलवर बोलणं म्हणजे पक्षाविरोधात बोलणं, मिलिंद नार्वेकरांचा बंगला स्वत: तोडला कारण तो अनाधिकृत होता

परब, नार्वेकरांची खासगी मालमत्ता ही शिवसेनेची झाली का?

मी उभं आयुष्य शिवसेनेसाठी संघर्ष केलेला मावळा आहे, अनिल परबांच्या रिसोर्टविरोधात बोललो म्हणून मेळाव्यात घोषणा दिल्या.

अनिल परबांनी वांद्रे येथून विधानसभेला किंवा मुंबई मनपाच्या वार्डात निवडून येऊन दाखवा.

अनिल परबांनी माझ्या मुलाला विधानसभेचे तिकिट मिळू नये म्हणून राष्ट्रवादीच्या संजय कदमांना तिनदा मातोश्रीवर घेऊन आले.

योगेश कदमांवर सुडाची भावना ठेऊन पालकमंत्री अनिल परब यांनी काम केले

मंत्रिपद मिळाल्यापासून अनिल परब शिवसेनेशी गद्दारी करतायेत, स्थानिक आमदाराला डावललं जातंय

शिवसेनेला राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारा अनिल परब गद्दार की रामदास कदम?

योगेश कदम यांनी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणं झालं.

टॅग्स :रामदास कदमशिवसेना