Join us  

"तुमचा फोटो नाही लावणार, पण आमच्या देवघरात असलेला तुमचा फोटो काढता का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 7:50 PM

बीड शहरात सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला.

मुंबई/बीड - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांचा धडाका लावला आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेतली होती. आता या सभेला प्रत्युत्तर म्हणून आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा बीडमध्ये सुरू झाली. या सभेच्या व्यासपीठावरुन बोलताना बीडमधील नेत्यांनी अजित पवारांसोबत असल्याचे सांगितले. त्यामध्ये, गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार करत, आम्ही यापुढे तुमचा फोटो लावणार नाही, असे म्हटले. तसेच, आमच्या देवघरातील फोटो हटवून दाखवा, असेही त्यांनी म्हटले. 

बीड शहरात सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णा भाऊ साठे पुतळा, जालना रोड, बार्शी रोड व नगर रोडवर जागोजागी स्वागत बॅनर, भव्य कटआउट्स तसेच स्वागत कमानी उभारल्या आहेत. सभेला लोकांसाठी अनेक ठिकाणांहून परिवहन महामंडळाच्या बसही लावल्या आहेत. मात्र, या सभेच्या ठिकाणी कुठेही शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला नाही. शरद पवार यांनी इशारा दिल्यानंतर प्रथमच अजित पवार गटाकडून शरद पवारांचे फोटो न लावता बीडमध्ये सभा होत आहे. या व्यासपीठावरुन बोलताना अमरसिंह पंडित यांनी शरद पवारांनी दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली.   

साहेब, तुम्ही म्हणालात की माझा फोटो लावायचा नाही, अन्यथा कायदेशीर कारवाई करेल. पण या शिवछत्राच्या देवघरात तुमचा फोटो आहे. या पंडित परिवाराच्या देवघरात तुमचा फोटो आहे, मग जाऊन काढता?. काढा एकदा पाहूयात तुमच्यात किती ताकद आहे? असा सवाल अमरसिंह पंडित यांनी विचारला. 

आम्ही तुमच्यावर मनातून प्रेम केलं, जन्मदात्या पित्याच्या पुढे नेऊन ठेवलं तुम्हाला. तुमचे आमच्यावर जे संस्कार आहेत, त्यानुसार तुम्ही म्हणत आहात तर यापुढे तुमचे फोटो लावणार नाही. पण, तुमचे संस्कार आमच्या मनातून काढता येतील का? असा सवालही अमरसिंह पंडित यांनी विचारला. प्रत्येकवेळी अजित दादांना गुन्हेगार कसं केलं जातं, हा आमच्या मनातील प्रश्न आहे. विनम्रपणे आज सांगतो, दादांसोबत राहण्याची आम्ही जी भूमिका घेतलीय ती बदलू शकणार नाही, निर्णय झालाय, मला पश्चाताप नसून मी अजित पवारांचा कार्यकर्ता असल्याचं सांगायला मला अभिमान आहे, असेही पंडित यांनी म्हटलं.  

टॅग्स :बीडअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस