सोमवारपासून सुरू झालेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवरून वादळी ठरत आहे. दरम्यान, आज समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या एका विधानामुळे अधिवेशनातील वाद आणखीच वाढण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला. तसेच माझा धर्म मला वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत नाही, असा दावा केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला.
अबू आझमी यावेळी म्हणाले की, आम्ही ते लोक आहोत, ज्यांच्या पूर्वजांनी या देशासाठी आपले प्राण दिले आहेत. आम्ही ते लोक आहोत ज्यांनी पाकिस्तानला नाही तर भारताला आपला देश मानला आहे. ज्याने या विश्वाची निर्मिती केली आहे, त्याच्यासमोरच मान झुकवली पाहिले, असं इस्लाम सांगतो. माझ्या धर्मातील शिकवणीनुसार मी वंदे मातरम म्हणू शकत नाही. मात्र त्यामुळे माझ्या हृदयात या देशाबद्दल असलेला आदर, माझी देशावरील निष्ठा कमी होत नाही. तसेच त्याला कुणाचा आक्षेपही असता कामा नये. जेवढे तुम्ही या देशाचे आहात, तेवढाच मीसुद्धा आहे.
अबू आझमी यांनी यावेळी सकल हिंदू समाजाकडून निघालेल्या मोर्चांवरही टीका केली. ते म्हणाले की, सकल हिंदू समाजाच्या सभांमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हिंसाचार झाला. मात्र या सभांमध्ये द्वेषपूर्ण भाषणं करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्याचा परिणाम म्हणून राम नवमी दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंसाचार झाला. तसेच घराच्या दरवाजावर उभ्या असलेल्या मुनिरुद्दीन याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. दंगलीत मारल्या गेलेल्या निर्दोषांच्या कुटुंबीयांसाठी तपासाचे आदेशही न देणे हा सरकारचा अहंकार आहे आणि हा अहंकार फार दिवस टिकत नाही, असेही अबू आझमी म्हणाले.