९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची पहिली घंटा आजपासून मुलुंडमध्ये निनादेल. त्याच्या अध्यक्षा आहेत, ५० वर्षांहून अधिक काळ संगीत रंगभूमीवर रसिकांना मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार. त्यांची नाट्यसंमेलनाबद्दलची भूमिका, नाट्यचळवळीबद्दल चिंतन...९८ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष या नात्याने तुम्ही कोणत्या मुद्द्यांचा प्राधान्याने विचार करत आहात?सध्याचा काळ विचित्र करमणुकीचा आहे. संगीत नाटकालाही फार चांगले दिवस नाहीत. अशा स्थितीत माझ्यासारख्या कलाकाराची अध्यक्षपदी निवड होणे ही मी सकारात्मक गोष्ट मानते. टीव्हीमुळे रसिक नाटकापासून दुरावला गेला आहे. त्यातून ज्या पद्धतीच्या मनोरंजनाचा भडिमार होतो आहे, त्याकडे पाठ फिरवून संगीत नाटकांच्या बैठका सुरू झाल्यास भारतीय नाट्यसंगीत परंपरा मूळ पदावर येईल. याचाच प्रामुख्याने मी संमेलनात उल्लेख करणार आहे. आपल्या समृद्ध संगीत रंगभूमीला तीच संपन्नता पुन्हा मिळवून देण्याची ही नामी संधी आहे. त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन.संमेलनाचा अध्यक्ष हा गुळाचा गणपती असतो, असे विधान बारामती नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी मोहन आगाशे यांनी केले होते. तुमचे याविषयी काय मत आहे?मी अजिबात गुळाचा गणपती बनून राहणार नाही. अध्यक्ष म्हणून माझ्याकडे नाट्यसंमेलनाचे फक्त तीन दिवस नाहीत, तर अख्खे वर्ष आहे. त्या काळात मला गुळाचा गणपती बनून राहायचे नाही. माझी काम करण्याची संपूर्ण तयारी आहे. त्याला नाट्य परिषदेच्या पदाधिकाºयांची, राज्यातील नाट्य परिषदेच्या शाखांची तितकीच उत्तम साथ असणेगरजेचे आहे. लक्षात घ्या, एकटा अध्यक्ष ही सर्व परिस्थिती बदलू शकत नाही. सर्व कार्यकर्ते त्याच्यासोबत असतील तरच प्रश्न सुटू शकतात. नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीतील शिलेदार नव्या दमाचे आहेत. त्यामुळेच आम्ही मिळून या प्रश्नांवर मात करू, असा विश्वास मला वाटतो.या वर्षीचे नाट्यसंमेलन सलग ६० तासांचे आहे. त्यात मध्यरात्रीच्या कार्यक्रमांना मुंबई-ठाण्यातील रसिकांचा कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत वेगवेगळी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटते?मुळात मुंबईकर रसिक चोखंदळ आहे. त्यांना उत्तम आविष्कार पाहायला मिळाले, तर ते वेळ-काळ पाहत नाहीत. या नाट्यसंमेलनात विदर्भाच्या झाडेपट्टी रंगभूमीपासून अनेक लोककलांचा सहभाग असलेले कार्यक्रम आहेत. असे कार्यक्रम मुंबईत फार कमी होतात. त्यामुळे रसिक प्रेक्षक अशा कार्यक्रमांना नक्की गर्दी करतील, याबद्दल शंका नाही.नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांची गर्दी अधिक आणि कलाकारांची कमी अशी दरवर्षीची ओरड असते. त्याविषयी तुमची भूमिका काय?कोणत्याही कलेला राजाश्रय हवाच असतो. इतकेमोठे संमेलन किंवा कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर राजकीय नेत्यांची मदत होतेच. कलाकार, पदाधिकारी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा जमवू शकत नाहीत. हे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन आहे. त्यामुळे येथे व्यासपीठावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रण दिले जाते. तरीही व्यासपीठावरील नेत्यांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे. विनोद तावडे हे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यांनीही हे रंगकर्मींचे संमेलन आहे हे आधीच जाहीर केलेले आहे.या नाट्यसंमेलनात तुम्ही संगीत स्वरसम्राज्ञी या नाट्याविष्कारातील काही भाग ‘बैठकीचे नाटक’ स्वरूपात सादर करणार आहात. या सादरीकरणाविषयी...मी पाच दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर कलाकार म्हणून वावरतेय. नाट्यसंमेलनात प्रत्येकाने कलाकार म्हणून सामील व्हावे आणि आपली कला सादर करावी, या मताची मी आहे. त्यामुळे मी या संमेलनात फक्त अध्यक्षपदाच्या खुर्चीत न बसता एक कलाकार म्हणून सामील व्हावे, असे ठरवले होते. त्यानुसार मुलाखत संपताच मी बैठकीचे नाटक नाट्यरसिकांसमोर सादर करणार आहे. शब्दांकन : अजय परचुरे
मी गुळाचा गणपती म्हणून बसणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 6:42 AM