मुंबई - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. शरद पवार हे खोटं बोलतात. त्यामुळे यापुढे त्यांच्याबाबत मी कुठलाही खुलासा देणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना, मी कधीही शरद पवारांचा पाठिंबा घेतला नाही. तसेच त्यांचा आणि माझा कुठलाही संबंध नाही, असेही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधीही युती करणार नाही. मात्र, काँग्रेससोबत युती करण्यास आम्ही तयार आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. त्यानंतर, एका निवडणुकीत भारिपला आपण कसा पाठिंबा दिला होता, याची आठवण करुन देताना प्रकाश आंबेडकरांनी मला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, असा टोला शरद पवार यांनी लगावला होता. त्यावर बोलताना, आंबेडकर यांनी पवार खोटं बोलतात. सन 1997-98 साली माझा काँग्रेसबरोबर समझोता झाला, तो तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याबरोबर झाला होता, त्यात माझ्या पक्षाला चार जागा देण्याचा निर्णय झाला होता. त्यात शरद पवार कुठेही नव्हते असे स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. विशेष म्हणजे शरद पवारांबाबत हा माझा अंतिम खुलासा असून यापुढे मी या विषयावर बोलणार नाही, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.