लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ओबीसींवर अन्याय होत असेल तर मी आंदोलनात उतरेन, असा इशारा देतानाच केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मुंबईत भुजबळ यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. मराठा समाजाचे आंदोलन, ओबीसींवर होणारा अन्याय, त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्या निवडणुकीत ओबीसी समाजाने घेतलेल्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा झाली.
केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलेले आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या नितीशकुमार यांनी बिहारमध्ये जातनिहाय जनगणना केलेली आहे. केंद्र सरकारने देशभर जातनिहाय जनगणना केली तर ओबीसींची खरी परिस्थिती समोर येईल. तसेच, एससी, एसटी समाजाला जसा केंद्राकडून निधी मिळतो, तसा निधी ओबीसींसाठी मिळेल, अशी भूमिका भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
वेगळा निर्णय घेणार?
लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली नाही तसेच राज्यसभेसाठी पक्षाने संधी दिली नाही, या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा, अशी मागणी समता परिषदेच्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा सोमवारी दिवसभर सुरू होती. मात्र. याला दुजोरा मिळू शकलेला नाही.