मी शिवसेनेतच राहणार: अमोल कीर्तिकर
By मनोहर कुंभेजकर | Published: November 12, 2022 06:15 PM2022-11-12T18:15:06+5:302022-11-12T18:16:12+5:30
अमोल कीर्तिकर हे युवसेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत.
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी काल रात्री प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. मात्र कीर्तिकर यांचे पूत्र व शिवसेना उपनेते-युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्या गटातच राहणार आहे.
शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज सकाळी गोरेगाव पश्चिम येथील जवाहर नगर येथील शिवसेना शाखेत संपन्न झाली. या बैठकीत अमोल कीर्तिकर,माजी नगरसेवक दिलीप शिंदे,माजी नगरसेवक समीर देसाई,दीपक सुर्वे,अजय नाईक आणि गोरेगावतील शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अमोल कीर्तिकर म्हणाले की,मी कट्टर शिवसैनिक असून शिवसेनेतच राहणार आहे. शिवसेनेच्या भविष्यातील वाटचाली संदर्भात सुभाष देसाई मार्गदर्शन केले. येत्या महापालिका निवडणूकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विधानसभेतील सर्व प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
कोण आहेत अमोल कीर्तिकर
अमोल कीर्तिकर हे युवसेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. 2010 पासून ते युवासेना सरचिटणीस असून अलीकडेच त्यांना शिवसेना उपनेते म्हणून बढती देण्यात आली.महाराष्ट्रात युवासेना मजबूत करण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार अतुल भातखळकर यांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला होता. अमोल कीर्तिकर हे कट्टर शिवसैनिक आहेत. पुढची 2024 ची उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदारकीचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर यापूर्वी मातोश्रीने शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. दि,3 नोव्हेंबरला झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या प्रचारात आणि विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"