Join us

मी ‘परम-सत्य’ उघडकीस आणेन, देशमुखांनी आयोगासमोर स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 9:56 AM

अनिल देशमुख; सचिन वाझेंना ओळखत नसल्याचा आयोगासमोर दावा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मी वैयक्तिकरीत्या ओळखत नव्हतो, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी न्या. कैलास चांदीवाल आयोगासमोर सांगितले. परमबीर सिंग यांच्या आरोपांच्या संदर्भात, ‘मी परम-सत्य’ उघडकीस आणेन, असे देशमुख यांनी सांगितले.

सचिन वाझेंच्या वकिलांनी अनिल देशमुख यांची उलटतपासणी केली. त्यानंतर देशमुख हे साक्षीदार कक्षातच उभे होते. ‘परम-सत्य’ काय आहे ते मी नक्कीच बाहेर काढेन आणि परम-सत्य जयते सिद्ध होईल, असे ते भावनिक होत म्हणाले. त्यांनी चारपाच पानेदेखील दाखविली. त्यावर न्या. चांदीवाल यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका आयोगासमोर मांडा, असे सांगितले.

अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. देशमुख यांनी ही खंडणी गोळा करण्यास सचिन वाझे यांना सांगितले होते, असा दावा सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. वाझे यांच्या वकिलांनी देशमुख यांची उलटतपासणी केली. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी तपासाबाबत माझ्याकडे सीआयडीमधूनच तक्रारी आल्या होत्या. त्याआधारे सीआयडी चौकशी अन्य अधिकाऱ्याकडे देण्याचा आदेश मी दिला, असे देशमुख यांनी सांगितले. नाईक आत्महत्या प्रकरण आणि मास्कच्या काळाबाजार या दोन प्रकरणांच्या चौकशीसाठी आपण वाझेंची मदत घ्यावी, असे निर्देश आपण दिले होते का? या वाझेंच्या वकिलांच्या प्रश्नावर देशमुख म्हणाले, मी त्यांना व्यक्तिगत ओळखत नव्हतो.

भारंबे यांच्याबाबतची मागणी फेटाळलीमुंबईचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना साक्षीसाठी बोलाविण्याची सचिन वाझे यांनी केलेली मागणी न्या. कैलास चांदीवाल यांनी फेटाळली. भारंबे यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात एक अहवाल राज्य सरकारला दिला होता. त्यामुळे त्यांना साक्षीसाठी बोलवावे, अशी विनंती वाझे यांनी गेल्या आठवड्यात आयोगास केली होती. 

टॅग्स :अनिल देशमुखपरम बीर सिंग