‘सोन्याचा नारल वाहीन मी तुला, हे देवा तारु येऊ दे बंदराला’, नारळी पौर्णिमा आज उत्साहात साजरी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:54 PM2023-08-30T12:54:43+5:302023-08-30T13:04:04+5:30
आज पूजेनंतर त्या समुद्रात जाण्यासाठी सज्ज होतील असे येथील कोळी बांधवांनी सांगितले.
मुंबई : कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण. ‘सोन्याचा नारल वाहीन मी तुला ! हे देवा तारु येऊ दे बंदराला!’
कोळी बांधवांनी अथांग सागरला अशी साद घालत मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी, धारावी, माहुल, कुलाबा येथील विविध कोळीवाड्यात आज सायंकाळी नारळी पौर्णिमा उत्साहात व जल्लोषात साजरी केली जाणार आहे.
कोळीवाड्यात दिवाळीप्रमाणेच उत्साहाचे वातावरण असते. घरोघरी गोडाधोडाचे जेवण बनविले जाते, असे सांगण्यात आले. बोटींना रंगवून ठेवल्या आहेत. आज पूजेनंतर त्या समुद्रात जाण्यासाठी सज्ज होतील असे येथील कोळी बांधवांनी सांगितले.
वेसावे कोळीवाडा
नारळी पौर्णिमेनिमित्त आज सायंकाळी मुंबईच्या विविध कोळीवाड्यांमध्ये मिरवणुका निघणार आहेत. मावळत्या सूर्याला साक्ष ठेवत वेसावे कोळीवाड्यातील विविध गल्लीच्या अध्यक्षांनी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ सागराला अर्पण केला जाणार आहे.
नारळाच्या बनविलेल्या करंजा यांचा नैवद्य बोट व समुद्राला दाखवून समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जतो. तर आमच्या बोटी सुखरूप किनारी येऊ दे, असे सागराचे पूजन करून कोळी महिला प्रार्थना करतात, अशी माहिती वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष राजहंस टपके व भगवान भानजी यांनी दिली.
खारदांडा कोळीवाडा
खारदांडा कोळीवाड्यात एकूण सहा पाडे असून, प्रत्येक पाड्यातून सोन्याचा नारळ सजवून येथील कोळीवाड्यातून मिरवणुका निघतात. शेवटी सर्व पाड्यातील सोन्याचे सजविलेले नारळ गावातील श्री राममंदिर व समुद्रकिनारी असलेले श्री हरबा माउली मंदिरात पूजा करून गाऱ्हाणे घातले जाते.
थोरामोठ्यांपासून लहान मुलांसह सगळे वाजत गाजत मिरवणुकीने बंदरावर येतात. पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका निघतात. समुद्रकिनारी पारंपरिक कोळी नृत्य व संगीताचे कार्यक्रम होतात. खारदांडा कोळीवाडा गावठाण संघाचे सचिव मनोज कोळी यांनी ही माहिती दिली.
वरळी कोळीवाडा
वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा या सणाची मजा तर काही औरच असते. नारळ वाढवण्याच्या (नारळ फोडण्याच्या) स्पर्धा असतात. एवढेच नव्हे तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी महिलांच्या नारळ फोडण्याच्या स्पर्धाही होतात. संध्याकाळी वरळी कोळीवाड्यातून मानाच्या दोन पालख्या निघतात. एक माणिक धर्मा पाटील जमा ट्रस्ट व हिरा कापर पाटील जमात यांच्या मानाच्या दोन पालख्या निघतात, अशी माहिती माणिक धर्मा पाटील जमा ट्रस्टचे अध्यक्ष विजय कोळी व ट्रस्टी श्याम वरळीकर, विनोद फणसे, योगेश समजे यांनी दिली.