Join us

"चुना कसा लावतात हे संजय राऊतांना योग्य वेळी दाखवेन’’, गावरान भाषेत गुलाबराव पाटलांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 1:01 PM

Gulabrao Patil : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा पान टपरीवर पाठवणार, असा इशारा देणाऱ्या संजय राऊत यांचा समाचार घेतला असून, चुना कसा लावतात हे संजय राऊतांना योग्य वेळी दाखवेन, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.

गुवाहाटी - महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड करून गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून बोचरी टीका होत होती. दरम्यान, बंडखोर आमदारांनीही आता आपल्यावरील टीकेला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. बंडखोरांना जाऊन मिळालेले शिवसेनेचे फायर ब्रँड नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा पान टपरीवर पाठवणार, असा इशारा देणाऱ्या संजय राऊत यांचा समाचार घेतला असून, चुना कसा लावतात हे संजय राऊतांना योग्य वेळी दाखवेन, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की,  आपण इथे कसे कसे आलो आहोत हे सांगण्याची गरज नाही. आपल्यावर मतदारसंघात विविध आरोप होतात. मात्र आपल्या बाजूनेही अनेकजण उभे राहत आहेत. आपण एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून इथे आलो आहोत. आपल्यावर भरपूर टीका झाली आहे. आमची प्रेतयात्रा काढली गेली. आमचे बाप किती हे विचारले गेले. आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहिती नाही. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलोय.  १९९२ च्या दंगलीत आम्ही तीन बंधू आणि वडील तुरुंगात होतो, तेव्हा संजय राऊत कुठे होते माहिती नाही. ५६, ३०२ संजय राऊत यांना माहिती नाही. तडीपारी काय असते राऊतांना माहिती नाही. दंगलीत पायी चालणं काय असतं माहिती नाही, अशा शब्दात त्यांनी दंगलीतील अनुभवही सांगितला.

हे लोक बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. मात्र आपण बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन क्रिया केलेल कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपला २० टक्के तरी स्वत:चा सहभाग आहे. ८० टक्के संघटनेचे श्रेय असले तरी २० टक्के आपली सगळ्यांची मेहनत आहे. संजय राऊत यांनी ४७ डिग्री तापमानात जळगावात येऊन ३५ टक्के लग्न लावावीत आम्ही ती ७२ समजून घेईन. त्या काळात आम्हीच लग्न लावतो. रात्री १२ वाजता रक्ताची गरज लागते तेव्हा माझा मोबाईल सुरू असतो. अॅम्बुलन्स हवी असेल तर उपलब्ध असते. कार्यकर्त्याच्या सुख-दु:खात सहभागी असतो, असे ते म्हणाले.

कार्यकर्त्यांना विश्वास आहे की, आम्ही शिवसेना सोडणार नाही. केसरकरजी तुम्ही जो बारीक दाल तडका देता त्यामुळे आपला फायदा होत आहे. हे जे चाललंय ते बरोबर चाललंय. ज्यावेळी मैदान येईल तेव्हा आपण ३९ आणि इतर अपक्ष मंडळी ही एवढेच सभागृहात वादविवादासाठी पुरेसे आहोत. तुम्ही बरोबर सांगितलंय की, त्यांनी वर्षा सोडली, संघटना सोडली, आमच्यासारख्या ५२ आमदारांना सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत. आम्ही त्यांच्या करिता काहीच केलेलं नाही असं नाही, भरपूर केलंय. आमची परिस्थिती नव्हती तेव्हा आम्ही काय काय केलंय, ते आम्हाला माहिती आहे. हे जे मिळालंय ते निश्चितपणे शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मिळालंय. पण त्यामध्ये आमचाही काही त्याग आहे. आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही केलं आहे. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबा नाही आहोत आम्ही. मला टपरीवर पाठवू म्हणून संजय राऊत सांगताहेत. मात्र चुना कसा लावतात हे त्यांना माहिती नाही. योग्य वेळ आल्यावर चुना कसा लावतात हे दाखवेन मी त्यांना, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला. 

टॅग्स :गुलाबराव पाटीलशिवसेनाउद्धव ठाकरेसंजय राऊत