Join us

देशभरातील क्षत्रियांच्या आरक्षणासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:06 AM

मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द करणारा निर्णय ...

मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. आम्ही न्यायालयाचा सन्मान राखतो, मात्र राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे. मराठा समाजाप्रमाणे देश भरातील जाट, राजपूत, रेड्डी आदी क्षत्रिय समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. देशभरातील गरीब क्षत्रियांना ज्यांचे उत्पन्न आठ लाखांपर्यंत आहे अशा क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे १२ टक्के आरक्षण द्यावे, अशी माझी मागणी आहे. त्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार आहे. क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे आरक्षण दिल्यास मराठा समाजाला त्यातून आरक्षण मिळेल.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढविता येत नाही, असे मत व्यक्त केले आहे. मात्र ते केवळ न्यायालयाचे मत आहे, कायदा नाही तसेच संविधानाचीही तशी गाइडलाइन नाही. त्यामुळे सवर्ण गरिबांसाठी दहा टक्के आरक्षणाचा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला असून, आरक्षण आता ५९.५० टक्के झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला १० ते १२ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मंजूर व्हायला पाहिजे होता. मराठा समाजात ७० टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने गरीब आहेत. त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणे गरजेचे आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आवश्यक असणाऱ्या आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली नसल्यानेच मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भारत सरकारमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. क्षत्रिय मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळवून देण्याची मागणी पंतप्रधानांकडे करणार आहे.