चिमुकल्यांना कुशीत घेऊन जागवली रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:35+5:302021-07-20T04:06:35+5:30
विक्रोळीच्या सूर्यानगर भागातील रहिवासी अजूनही भीतीच्या छायेखाली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विक्रोळीच्या सूर्यानगर भागात शनिवारी मध्यरात्री दरड कोसळून ...
विक्रोळीच्या सूर्यानगर भागातील रहिवासी अजूनही भीतीच्या छायेखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विक्रोळीच्या सूर्यानगर भागात शनिवारी मध्यरात्री दरड कोसळून १० जणांचा मृत्यू झाला होता. येथे राहणाऱ्यांची रविवारची रात्रही धडकी भरवणारी होती. विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे चिमकुल्यांंना कुशीत घेऊन आम्ही रात्र जागविल्याचे येथील रहिवासी सांगतात.
विक्रोळीतील पंचशील चाळीतील दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणाने काही रहिवाशांनी नातेवाइकांकडे धाव घेतली, तर ३० जणांची भांडुपच्या ईश्वरनगर येथील पालिका शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी यातीलही काहीजण नातेवाइकांकडे गेल्याची माहिती भांडुप एस वॉर्डचे सहायक आयुक्त विभास आचरेकर यांनी दिली.
याच डोंगराळ भागात राहणाऱ्या इतर लोकांनी मात्र भीतीच्या छायेखालीच रविवारची रात्र ढकलली. विक्रोळीच्या सूर्यानगर येथील रहिवासी संदीप डोंगरे सांगतात, ज्यांना शक्य आहे त्यांनी नातेवाइकांकडे धाव घेतली. मात्र, ज्यांना पर्याय नाही असे आमच्यासारखे अनेकजण येथेच आहेत. या घटनेमुळे मुलेही घाबरली आहेत. त्यांना कुशीत घेऊन आम्हाला रात्र जागूनच काढावी लागली. रात्रभर घराबाहेर ये-जा सुरू होती. वरून पुन्हा कुठला भाग कोसळणार तर नाही ना या विचारातच आम्ही होतो.
याच भागात राहणाऱ्या पूनम माने सांगतात, यापूर्वी वादळातून कसेबसे सावरले. त्यात मुलगा घाबरल्याने त्याला आई-वडिलांकडे ठेवले. आता कालच्या दुर्घटनेनंतर आमची झोपच उडाली आहे. एकामागोमाग एक बाहेर काढलेले मृतदेह नजरेसमोरून जात नाहीत. मुलगा घरी यायलाही घाबरतो. घरात फक्त जेवण बनविण्यासाठी आले, रात्री झोपण्यासाठी आईकडेच गेले.
तरुणीच्या बचाव कार्याचे ते दीड तास
येथील रहिवासी संदीप डोंगरे यांनी सांगितले की, शनिवारच्या दुर्घटनेवेळी आक्रोश आणि जीव वाचविण्याची सगळ्यांची धडपड सुरू होती. चाळीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. आम्ही पाहिले तेव्हा घर कोसळलेल्या ठिकाणी तोपर्यंत तीन मृतदेह काढले होते. पुढे ढिगाऱ्याखाली पाय अडकलेली एक तरुणी दिसली. आमच्याकडून तिला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असताना अग्निशमन दल, एनडीआरएफचे पथकही दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर सादनी तिवारी या तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.