मुंबई: मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाब नाव द्यावं अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली होती. राहुल शेवाळे यांच्या या मागणीनंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला. तसेच शिवसेनेच्या भूमिकेवरुनही अनेक सवाल विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. मात्र यावर राहुल शेवाळे यांनीच आता स्पष्टीकरण दिलं आहे.
लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या विविध प्रकारच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविणे, हे माझे कर्तव्य आहे. घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या नामकरणाबाबतही तिथल्या स्थानिकांची मागणी केवळ सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम मी केले, असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाला नेमके काय नाव द्यायचे, याचा अंतिम निर्णय मुंबई महानगरपालिकेकडून घेतला जाईल, असंही राहुल शेवाळे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
सर्व महापुरुषांविषयी मला नितांत आदर आहे. मात्र, केवळ स्वार्थासाठी या साऱ्या प्रकरणाबाबत गैरसमज निर्माण करून, याला धार्मिक रंग देऊन अतिशय हीन राजकारण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत, ही खेदाची बाब असल्याचे सांगत राहुल शेवाळे यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र का?- भाजपा
उड्डाणपूल पालिकेचा तर नामकरणाबाबत महापालिकेला पत्र न देता मुख्यमंत्र्यांना का, असा सवाल भाजपचे प्रवक्ता नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे. या उड्डाणपुलाला 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचे नाव दिले जात नाही, तोपर्यंत भाजप पालिका सभागृहात स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू, असा इशारा भालचंद्र शिरसाट यांनी दिला.