Join us

पक्षाने मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तरी बसलो असतो; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 12:50 PM

भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

मुंबई- विधानसभेत भाजपा आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजपा-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. दरम्यान, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शाह फारूख अन्वर मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. 

भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मला सर्वोच्च स्थानावर बसवलं त्या पक्षाने मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तरी बसलो असतो. तसेच एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने मी उभा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

एकनाथ शिंदे यांची कारकीर्द यशस्वी होईलच, पण ती अधिक यशस्वी कशी होईल हा प्रयत्न मी करणार आहे. त्यांच्यात माझ्यात कधीही दुरावा, पॉवर स्ट्रगल, कुरघोडीचं राजकारण दिसणार नाही. कारण कधी आम्ही सोबत होतो, कधी वेगळ्या बाकांवर होतो आमच्यातली मैत्री कायम राहिली, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

मी एवढंच सांगू शकेन जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते. तेव्हा चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि निरंकुश सत्ता खाली आणावी लागते. एकदा सरकार बनल्यानंतर ते मोकळ्या मनाने स्वीकारलं पाहिजे. संघ, संघाची भूमिका, संघाची शिस्त याबद्दल शरद पवारांनी गौरवपूर्ण उल्लेख केला मला आनंद आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे याचा मला अभिमान आहे. त्यामुळे पवारांचेही मनापासून आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 

राज ठाकरेंचे मानले आभार-

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिलं. त्यांच्या पत्राला उत्तर द्यायचा मी विचार केला, पण मला शब्द सुचले नाहीत. त्यामुळे फोन करून राज ठाकरेंचे आभार मानले. त्यांची भेटही घेणार आहे. आपण सगळे राजकीय विरोधक, आपण शत्रू नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार