‘सैराट’सारखी कथा असल्यास मराठीत काम करायला आवडेल : आयुष्मान खुराणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 07:34 PM2024-03-18T19:34:02+5:302024-03-18T19:34:09+5:30

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयुष्मानचा 'स्टार ऑफ़ द डीकेड' पुरस्काराने गौरव

I would like to work in Marathi if there is a story like 'Sairat': Ayushmann Khurrana | ‘सैराट’सारखी कथा असल्यास मराठीत काम करायला आवडेल : आयुष्मान खुराणा

‘सैराट’सारखी कथा असल्यास मराठीत काम करायला आवडेल : आयुष्मान खुराणा

मुंबई- हिंदी सिनेमा नव्हे, तर प्रत्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपट हे यशस्वी होत आहेत. विविध प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धमाल उडवली आहे. त्यामुळे ‘सैराट’सारखी वेगळी कथा असल्यास मला मराठी सिनेमात काम करायला नक्कीच आवडेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराणाने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने संघामध्ये आयुष्यमानसोबत वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयुष्मानने पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटातील करिअरची सुरूवात ते राष्ट्रीय पुरस्कार पर्यंतचा १२ वर्षांचा प्रवास आयुष्मानने उलगडला. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांच्या हस्ते आयुष्मानचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वाबळे यांनी ‘स्टार ऑफ द डिकेड’ (दशकातील सर्वोत्तम अभिनेता) अशा शब्दांत आयुष्मानचा गौरव केला.

यावेळी आयुष्मान म्हणाला की, कोणत्याही सिनेमात काम करताना तो सिनेमा हिट होईल, या उद्देशाने मी कधीच काम करीत नाही. जी कथा कधीच पडद्यावर आलेली नाही, प्रेक्षकांसाठी वेगळी आणि नवीनच असेल आणि नवीन काहीतरी करायचे या विचारानेच काम करतो. चंदीगड ही माझी जन्मभूमी असली तरी मुंबई कर्मभूमी आहे. सगळेजण स्वप्न घेऊन मुंबईत येतात तसाच मी मुंबईत आलो आणि मुंबईकर झालो. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पुरस्कार मिळावा या उद्देशाने सिनेमात कधीच काम करत नाही आणि केलेही नाही. प्रेक्षकांना आवडेल, भावेल अशाच नवनवीन भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो.

नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करूनच आपण अनेक हिट सिनेमे दिले असून, त्यांच्याकडे रिस्क घेण्याची क्षमता असल्याचेही आयुष्मान म्हणाला. आयुष्मानने सादर केलेल्या 'आलमारी की खुशबू' या कवितेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह संदीप चव्हाण, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी केले. याप्रसंगी विश्वस्त वैजयंती कुलकर्णी-आपटे आणि राही भिडे उपस्थित होत्या.

Web Title: I would like to work in Marathi if there is a story like 'Sairat': Ayushmann Khurrana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.